पिंपरी चिंचवड : घराणेशाहीचा आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विखे आणि मोहिते घराणं कसं काय चालतं? असा खडा सवाल शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी बंधू रोहित यांनी विविध ठिकाणी बैठका घेतल्या. त्यावेळी अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर रोहित पवारांनीही पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. देशातील सध्याची परिस्थिती पाहता संविधानाने दिलेली मतदानाचा हक्कही हिरावून घेतला जाईल, अशी भीती वाटत असल्याचं रोहित म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही भीती व्यक्त केली.

रोहित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- दादा म्हणताय तिथपर्यंत ठीक आहे. तेही माझ्यापेक्षा लहानग्यांनी म्हणावं. पण नेता, युवा नेता असं म्हणू नका, असं आवाहन करतो. मी तुमचा मित्र आहे, तुमचा मित्र वाटावा म्हणून जीन्स पॅन्ट, शर्ट असे कपडे घालतो.

- कोल्हापूरच्या मंचावर मुख्यमंत्री म्हणाले गेल्या 70 वर्षात पश्चिम महाराष्ट्र खड्ड्यात घातला. तेव्हा मंचावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. पण ते टाळ्या वाजवणारे कोण होते? विखे, मोहिते पाटील, निंबाळकर असे आघाडीतून तिकडे गेलेली मंडळी. यांना मुख्यमंत्री काय बोलतात हे कळत नाही. कारण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय होतो तर यांच्या आजोबांनी विकास केला नाही असंच झालं ना?

- मुख्यमंत्री इतक्या मोठ्याने बोलत होते, कदाचित समोरुन टाळ्या वाजत नव्हत्या, म्हणून तसं बोलत असावेत. पण त्यांच्या भाषणात विकास सापडत नाही. काय बोलतात तर घराणेशाही, हा नेता तो नेता फक्त इतकेच आरोप. यात महत्वाचं म्हणजे घराणेशाहीवर जोर देतात. मग मला सांगा मुख्यमंत्र्यांना विखे घराणं, मोहिते घराणं यांना कसं काय चालतं. आता पार्थ कष्ट घेतोय, पण त्याच्यावर फक्त घराणेशाही असा आरोप केला जातोय. व्यवसायात घराणेशाही चालते मग राजकारणात का नाही चालत?

- एका भाषणामुळे किती बाऊ करायचा? मंचावर साहेब आणि दादा असताना माझीही पार्थ सारखीच परिस्थिती होते.

- पिंपरी चिंचवड शहरात 80 पेक्षा जास्त हत्या झाल्यात, याचा अर्थ काय? शहरात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कारवाई होत नाही का? पोलिसांवर दबाव आहे का?

- सोशल मीडियावर या सरकारला प्रश्न विचारा. आता बास झाली डायलॉगबाजी, मुद्द्याचं बोला.

- मुंबईमध्ये पेंग्विन आणता, अरे आधी वाघ, सिंह जिवंत ठेवा. मग पेंग्विन चं पाहू.

- सध्याची परिस्थिती अशी आहे की संविधानाने मतदानाचा दिलेला हक्क भविष्यात हिरावून घेतला जाईल का? अशी भीती वाटते. बोलायचीही सोय राहिली नाही. विरोधात बोलायला गेला की तुरुंगात घालतात, फेसबुकवर बोललं की गुन्हा दाखल करतात. कोणी एखादा वक्ता अथवा लेखक असेल तर त्याची ही काय अवस्था झाली हे आपण पाहिलंय.

- दात घासताना असो, केस कापताना असो की अगदी कोणत्याही ठिकाणी कोणी शेजारी उभं असेल तिथं आघाडीचा प्रचार करा.