Mahavitaran: राज्यातील वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरणकडून (Mahavitaran) विविध पातळीवर प्रयत्न सुरू असतात. महावितरणने मागील महिन्यात वीजचोरांवर केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. डिसेंबर महिन्यात महावितरणने केलेल्या कारवाईत 11 कोटींची वीजचोरी उघड झाली आहे. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने केलेल्या कारवाईत राज्यात वीजचोरीची 879 प्रकरणे उघडकीस आली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या 63 भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली. महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती महावितरणने दिली. वीजचोरीशिवाय इतर अनियमितता असलेल्या एकूण 539 प्रकरणांमध्ये 13 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांची वीजदेयकेही देण्यात आली. वीजचोरी पकडलेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश असल्याची माहिती महावितरणने दिली.
पुण्याजवळ वाघोली येथे भरारी पथकाने धाड टाकली असता दोन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. त्यांना 1 कोटी 44 लाख रुपयांच्या वीजचोरीचे बिल देण्यात आले. दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 नुसार, वीजचोरी फिर्याद दाखल करण्यात आली. उल्हासनगरमध्ये एका औद्योगिक ग्राहकावर धाड टाकल्यावर वीजचोरी उघडकीस आली. त्या ग्राहकास 31 लाख 65 हजार रुपयांच्या वीजचोरीचे बिल देण्यात आले. जालना जिल्ह्यात एका स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली व संबंधितांना 51 लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. तसेच त्यांच्या विरोधात वीजचोरीची तक्रारही दाखल करण्यात आली. अशाच पद्धतीने इतर अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.
कोणत्या विभागात किती वीजचोरी?
डिसेंबर महिन्यात सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने केलेल्या कारवाईमध्ये उघड झालेल्या 879 प्रकरणातील 11 कोटी 69 लाख रुपयांच्या वीजचोरीपैकी कोकण परिक्षेत्रात 4 कोटी 40 लाख रुपयांची 249 प्रकरणे उघडकीस आली. पुणे परिक्षेत्रात 3 कोटी 68 लाख रुपयांची 135 प्रकरणे उघडकीस आली. तर, नागपूर परिक्षेत्रात 244 प्रकरणांमध्ये एक कोटी 72 लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. औरंगाबाद परिक्षेत्रात एक कोटी 88 लाख रुपयांची 251 वीजचोरीची प्रकरणे उघड झाली.
सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत भरारी पथकांमार्फत एकूण 6801 प्रकरणे उघडकीस आणली. त्यामध्ये 86 कोटी 10 लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याखेरीज इतर अनियमितता असलेल्या एकूण 6336 प्रकरणांमध्ये 167 कोटी 11 लाख रुपयांची वीज बिले देण्यात आली.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या सर्व मुख्य अभियंत्यांना वीजचोरी रोखण्यासाठी आक्रमकपणे कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. कंपनीच्या भरारी पथकाखेरीज स्थानिक कर्मचाऱ्यांनीही सजगपणे वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याचा आणि संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.