Aurangabad Accident News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पैठण-शहागड रोडवर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या काळी-पिवळी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात काळी-पिवळी चालकाचा धड व शीर वेगळे झाले आहे. तर हा अपघात एवढा भीषण होता की, काळी-पिवळीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. काळी-पिवळी चालकाचा अचानक नियंत्रण सुटल्याने तो ऊसाच्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पैठण-शहागड रस्त्यावरील आयटीआयसमोर भरधाव वेगाने जाणारी  काळी-पिवळी जीप (एमएच 20 बीटी 7234) अचानक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडकली. अंगावर शहारे आणणाऱ्या या भीषण अपघातात काळी-पिवळी चालक नारायण (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्या डोक्याचे दोन भाग झाले.  तर जीपच्या समोरच्या भागात रक्ताचा सडा पाहायला मिळत होता. 


मिळालेल्या माहितीनुसार, काळी-पिवळी चालक पैठणहून तुळजापूरकडे जात होता. काळी-पिवळी प्रचंड वेगात होती. तर ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टरदेखील तितक्याच वेगात जात होता. मात्र याचवेळी काळी-पीवळी चालक नारायणचे वाहनाववरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील ऊसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने काळी-पिवळी चालकाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे काळी-पिवळी चालकाचा धड व शीर वेगळे होऊन डोक्याचे दोन भाग झाले होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी काळी-पिवळी चालकाला शासकीय घाटी रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 


ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्याची मागणी


पैठण-शहागड रोडवर असलेल्या आयटीआयसमोर वर्षभरात आतापर्यंत 8 ते 10 अपघात झाले आहेत.  यामध्ये 5 ते 6 जणांचा मृत्यूही झाला आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होणार नाही यादृष्टीने पाऊले उचलण्यात यावे आणि या स्थळाला ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. 


ऊसाचे ट्रॅक्टरमुळे अपघात वाढले...


सद्या सर्वत्र ऊसाची तोडणी सुरु आहे. त्यामुळे आपला ऊस कारखान्यात पाठवण्यासाठी शेतकरी ऊसाचे ट्रॅक्टरमधून त्याची वाहतूक करतात. मात्र अनेकदा काही ऊसाचे ट्रॅक्टर चालक अतिवेगाने चालवतात. तसेच ऊसाचे ट्रॅक्टर अनेकदा मागच्या बाजूने समजून येत नाही, त्यामुळे रेडीअम किंवा लाईट लावण्याची गरज आहे. तर अनेकदा ऊसाचे ट्रॅक्टर चालवणारे जोरात गाणे वाजवत वाहन चालवत असल्याने त्यांना मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे यातून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad: औरंगाबादच्या आपेगावात पुन्हा बिबट्याची दहशत; गेल्यावर्षी घेतला होता पिता-पुत्राचा जीव