मुंबई : यंदाचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे. या अधिवेशनत महाविकास आघाडी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. पण त्या आधीच महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत या वेळी निमित्त आहे 'निधी वाटप'.


काँग्रेस मंत्र्यांनी या आधी देखील निधी वाटप बाबत नाराजी जाहीर केली होती. पण अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी विभागवार बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात वार्षिक आराखड्यात निधी कमी केल्याची तक्रार काँग्रेस मंत्र्यांनी केली आहे.


कॅबिनेट संपल्यावर काँग्रेसचे सर्व मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर गेले होते. तिथे मंत्र्यांनी आपल्या विभागाला मिळणारा निधी, त्याला लावलेली कात्री,जिल्ह्याला मिळणारा निधी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात आणि मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचले. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थमंत्री झुकत माप देत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना अधिकच निधी मिळाल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचे वाटप रखडले असल्याचे काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.


काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळत नसणाऱ्या निधींबाबत याआधी जाहीर रित्या अशोक चव्हाण,विजय वड्डेटीवर यांनी वाचा फोडली आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत पत्र लिहिले होते. तरीही याबाबत कारवाई न केल्याने अर्थसंकल्पाच्या आधी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आणि मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर येणाऱ्या अर्थसंकल्पात काही बदल दिसणार का? काँग्रेस मंत्र्यांना निधी मिळणार का हा प्रश्न आहे.


महाविकास आघाडी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. गेल्या वर्षीपासून मान्सून असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज दोन दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे लोकसभेचं कामकाज चालतं त्यानुसार इथलंही कामकाज चालावं अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.त्यामुळे एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस चालणार? कामकाज कसं असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Assembly Budget Session | विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाने पर्याय सुचवला!