नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता असून याठिकाणी आमदार गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. गणेश नाईक शिवसेना, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळेच गणेश नाईक यांना दणका देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. भाजपा हातून नवी मुंबई महापालिकेची सत्ता खेचून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जोरदार तयारी करत आहेत. याचाच भाग म्हणून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


या मेळाव्याला शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून विश्वजीत कदम, अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर आली असल्याने येथील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. तीन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याने तिकीट वाटपावरुन बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीने ही बंडखोरी रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरु केले आहेत.



भाजपची पर्यायाने गणेश नाईकांची सत्ता रोखण्यासाठी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागावं, असं आवाहन आजच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. बंडखोरी करून पक्षाला, महाविकास आघाडीला अडचणीत आणू नका, अशी भावनिक सादही घातली जाणार असल्याची शक्यता आहे.

एकीकडे महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असताना, भाजपाने मात्र आपल्यासमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडे असलेल्या शहरांची बिकट अवस्था असून नवी मुंबईचा आपण सर्वांगीण विकास केला आहे. नवी मुंबईकर आम्हाला गेल्या 25 वर्षांपासून निवडून देत आहेत, असं भाजप नेते गणेश नाईक यांनी म्हटलं. दुसरीकडे भाजपातही सर्व काही आलबेल नसून जुनी भाजपा आणि पक्षात नवीन आलेले गणेश नाईकांची भाजप असे दोन गट पडले आहेत. कोणत्या गटाला उमेदवारी द्यायची यावरुन भाजपातही वाद सुरु झाले आहेत.


नवी मुंबई महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल


भाजपा - 60 नगरसेवक
शिवसेना - 38 नगरसेवक
काँग्रेस - 10 नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस - 3 नगरसेवक