मुंबई : "राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीची चौकशी सुरु आहे. त्यांना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. मला वाटतंय, झोटींग समितीचा अहवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी गायब केला आहे. एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे.", आशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी झोटींग समितीचा अहवाल गायब होण्याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, "आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे."


दरमान्य प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील उत्तरं दिली. नाना पटोले यांच्या विधानाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, "नाना पटोले यांनी अनेकवेळा अशाप्रकारे आपली तलवार म्यांन केली आहे. आता नानांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे. नाना पटोले यांच्या भावना खऱ्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना खऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी भावना ताकदीने मांडल्या. परंतु त्यानंतर अजित दादांची नाराजी, मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार त्यामुळे ते शांत झाले आहेत. त्यामुळं त्यांनी तलवार म्यान केली आहे. भावना तर त्यांनी प्रकट केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे दिसत आहे. जे एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय विश्वास देणार?"


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडसाठी नव्याने जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, "कारशेडचा विषय प्रतिष्ठेचा न बनवता निर्णय घ्यावा. कारण हा प्रोजेक्ट लांबत चालला आहे. कर्जाची रक्कम देखील वाढतेय. सध्या राज्यावर यामुळे हजारो कोटी रुपयांचं बर्डन येत आहे. पर्यायी याचा भुर्दंड मुंबईकरांवर पडणार आहे. त्यामुळे यासाठी काहीतरी वेळ निश्चित करायला हवी. अन्यथा याचा बोजा मुंबईकरांवर पडल्याशिवाय राहणार नाही. चंद्रकांत पाटील यांच्या ईडी चौकशीची मागणी समोर येऊ लागली आहे. याला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जगातील जितक्या संस्था आहेत, त्या लावा. दादा हे प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ईडी, एनआयएच्या चौकशा लावल्या तर चंद्रकांत पाटील स्वतः चौकशीला सामोरे जातील. दादा फकीर माणूस आहे. त्यामुळे आरोप तरी कुणावर करावेत हे कळायला हवं." 


संजय राठोड यांना परत मंत्रिमंडळात घेणार आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, "या सरकारला लाज राहिली नाही. ते जरी संजय राठोडला आणायचा प्रयत्न करत असले तरी जनता मूर्ख नाही. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिला आहे की, जर असं काही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जनतेला गृहीत धरून सरकारने वागू नये. कायदा म्हंटला की, पक्षीय भेदाभेद होऊ शकत नाही. आपला कायदा सर्वांना समान आहे. कारखान्याच्या संदर्भात जी काही चौकशी होत आहे ती संस्था म्हणून होत आहे." मात्र पंकजा मुंडेबाबत प्रश्न विचारताच दरेकरांनी हात जोडत काढता पाय घेतला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :