पुणे : राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. 31 डिसेंबरआधी 5 हजार 200 पदं भरण्यात येणार आहेत. त्यानंतर सात हजार पदं भरले जातील अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. 


महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी 5 हजार 200 पदांची भर्ती करण्यात येणार असून त्यानंतर 7 हजार पदं भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "बऱ्याच दिवसांपासून रखडलेली पोलीस भरती आहे. त्या पोलीस भरतीच्या संदर्भातील निर्णय आम्ही घेतलेला आहे. सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी ही 5 हजार 200 पदांची भर्ती करण्याचा निर्णय केलेला आहे. यासाठी कॅबिनेटनं मंजूरीही दिली आहे. अशी आणखी 7 हजार पदं आहेत. या पदांचा निर्णय मार्गी लागल्यानंतर आपण आणखी त्या 7 हजार पदांचीही भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत. यासंदर्भातील प्रक्रियाही लवकरात लवकर सुरु केली जाईल."


दरम्यान, पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनंतर बढती दिली जाते. सहायक फौजदार झाल्यानंतर तो कर्मचारी सेवानिवृत्त होतो. मात्र निवृत्त होताना पोलिसांमधील सहायक फौजदार पदावरील कर्मचाऱ्यांचे वेतन हे उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांएवढे आहे. किंबहुना अनेक हवालदारांचे वेतन उपनिरीक्षकांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे त्यांना निवृत्तीपर्यंत उपनिरीक्षकपदापर्यंत बढती देण्याचा विचार गृह विभागाने घेतल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :