मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटल आहे. सत्तेत असलो तरी गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते मला सुखाने जगू देणार नाहीत. ते माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीवर केला आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही यावरून टार्गेट केलं आहे. लोणावळा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे आरोप केले आहेत. यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे. नेहमीच वादग्रस्त विधान करून महाविकास आघाडीलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची नाराजी अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत या विषयावर बोलण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.


प्रत्येक राजकीय कार्यक्रमाची माहिती पोलिसांच्या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जात असते. जर नाना पटोले यांना हे माहीत नसेल तर त्यांच्या पक्षात माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्यावी. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली पाहिजे. जर त्यांना व त्यांच्या नेत्यांना पोलिसांची सुरक्षा नको असेल तर त्यांनी गृह विभागाकडे तसा अर्ज करावा. गृहविभाग यावरती योग्य तो निर्णय घेईल, असं ही नवाब मलिक यांनी नाना पटोले यांच्या आरोपांना उत्तर देत टीका केली. स्वबळाचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून मला पिंजऱ्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सोबत राहून ही पाठीत सुरा खूपसण्याचे काम होत असल्याचाही आरोप ही यावेळी नाना पटोले यांनी केला होता.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, ...म्हणून त्यांनी नाना पटोलेंवर पाळत ठेवली असावी


बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते कोणाचे काम करतात? आपल्या लोकांची काम करतात का? असा निशाणा नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर साधला होता. मी लहान व्यक्तीवर बोलत नाही असं सांगत शरद पवार यांनी यावर बोलायचं टाळलं. तर नाना पटोले यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे त्यांनाच विचारलं पाहिजे, असं महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. नाना पटोले कोणत्याही प्रकारे नाराज नाही आणि महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याची सारवासारव यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; नाना पटोलेंचा गंभीर आरोप


नाना पटोले यांच्या स्वबळाची घोषणा असेल किंवा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर साधलेला निशाणा असेल. हे महाविकास आघाडीत खळबळ माजवणारी वक्तव्य आहेत. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे आणि त्याचीच निवडणूक लावण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी फारशी उत्सुक नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे याच नाराजीतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खळबळजनक आरोप होत आहेत का? असाही प्रश्न आता समोर येत आहेत.