सांगली : कोरोना म्हणजे थोतांड असून शासन हा थोतांड का वाढवत आहे, कळत नाही. मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पंढरपूरच्या वारीवर घेण्यात आलेल्या बंदीच्या बाबतीत खरंतर वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं आणि आजचे राज्यकर्तेही किमतीचे नाहीत, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शंका उपस्थित केली आहे. देशाच्या इस्लामिक स्वारांनी महाराष्ट्रला मातीत घातलं. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण वारीमुळे कोरोना वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे आणि हे सरकार हा थोतांड का वाढवत आहे हे कळत नाही, असं संभाजी भिडेंनी म्हटलं. 


पण या कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल, तर लोकांच्यामध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती, तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की कोरोना हे षड्यंत्र आहे. देशाचा हे दुर्दैव आहे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. तर पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर  वारकर्‍यांनी रस्त्यावर उतरायला हवे होतं, असंही त्यांनी म्हटलं.


संभाजी भिडेंना राज्यातून तडीपार कर : सचिन खरात


संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाज व्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे. मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने गुन्हा दाखल करून तात्काळ महाराष्ट्र राज्यातून तडीपार करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.