मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांचा महासागर पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील पाचही ज्योतिर्लिंग भाविकांनी गजबजून गेली आहेत. पुण्यातील खेड इथलं भीमाशंकर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, हिंगोलीचं औंढा नागनाथ, औरंगाबादचं घृष्णेश्वर आणि परळीच्या वैजनाथ मंदिरात भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सोबतच ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची गर्दी झाली असून हर हर महादेवचा गजर घुमत आहे.

घृष्णश्वेर मंदिर : आज महाशिवरात्री औरंगाबादेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णश्वेर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं या मंदिराला पूर्ण प्रदक्षणा घातली जाते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल झाले आहेत. महाशिवरात्रिला शिवाचे दर्शन व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेशसह इतर राज्यातील विविध भागातील भाविक शिवाला बेलफुल वाहण्यासाठी दाखल झाले आहेत.

विठ्ठल मंदिर : आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिरास बेलाच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठुरायाने मस्तकी शिवाला धारण केल्याची वारकरी सांप्रदायात धारणा आहे. विठुरायाच्या स्वयंभू मुर्तीत मस्तकावर शिवाची पिंड असल्याने हे हरीहर रुप मानले जाते . त्यामुळेच आज महाशिवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात हजारो बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली आहे. आज महाशिवरात्रीला विठुरायाच्या या लोभस रुपाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकानी पंढरपूर मध्ये गर्दी केली आहे.

 त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. भगवान शंकराला बेलफुल वाहण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्यात. पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येत होते. मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीला गर्भगृहात प्रवेश देण्यात येत नाही.

 तुंगारेश्वर मंदिर : वसईच्या प्राचीन तुंगारेश्वर मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात उंच डोंगरावर तब्बल 2177 फुटांवर वसलेलं फार जुनं आणि प्रसिद्ध असं हे शिवमंदिर आहे. रात्री बारा वाजल्यापासून इथं शिवभक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय. महाशिवरात्रीला जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. मुंबई, ठाणे, वसई-विरारसह शेजारी गुजरात राज्यातूनही भाविक इथं येतात. दोन ते तीन तास रांगेत उभं राहून महादेवाचं दर्शन घेतात. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी सर्व व्यवस्था केलीय.

प्रवरासंगम : महाशिवरात्री निमित्त नेवासा तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र सिद्धेश्वर येथे शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला गंगाआरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम हजारो दिव्यांनी उजळून गेला होता.

कपिलेश्वर मंदिर : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमधल्या कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविधरंगी दिव्यांच्या माळांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर उजळून निघाला.

प्रतापगड यात्रा : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडची यात्रा राष्ट्रीय एकात्मतेचं तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रतापगड इथं मोठा महादेव तर त्यालाच लागून उंच डोंगरावर मुस्लिम बांधवांचे सूफी संत ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांचा दर्गा आहे. दरवर्षी महाशिवरात्रीपासून आठ दिवस इथं यात्रा भरते. या यात्रेला हिंदू मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होते. भगवान शंकर आणि ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांच्या दर्ग्यावर भाविक नतमस्तक होतात. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

मुक्ताई मंदिर : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात संत मुक्ताई मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आज देखील मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याच पाहायला मिळत आहे. सालाबादप्रमाणे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही मुक्ताईचं आज दर्शन घेतले आहे

अंबरनाथ : महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर पाहायला मिळतोय. अंबरनाथचं शिवमंदिर हे तब्बल 960 वर्ष जुनं असून हे हेमांडपंथी मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानलं जातं. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीतही या मंदिराचा समावेश आहे. महाशिवरात्रीला लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतत. रात्री 12 वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने पूजा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं.  मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आलेला नाही. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा परिसरही सजवण्यात आला आहे.  महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जत्राही भरते. त्यासाठीही लाखो लोक अंबरनाथला येत असतात.



वैजनाथ जोतिर्लिंग : भारतातील बारा जोतीर्लिंगांपैकी पाचवं जोतिर्लिंग म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथमधलं वैजनाथ जोतिर्लिंग. महाशिवरात्रीला वैजनाथ मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होत असतो. यासोबतच श्रावण मासातील सोमवारी दूरदुरून लोक दर्शनासाठी इथे येत असतात. परळी शहराच्या दक्षिणेला डोंगराच्या पायथ्याशी हे वैजनाथ मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची दगडी विशाल पिंड आहे. मंदिराचं मुख्य द्वार पूर्वेला आहे. मंदिराच्या चारही बाजूला भक्कम तट असून मंदिरात मोठं प्रांगण आणि ओवऱ्या आहेत. त्रेतायुगात या मंदिराची बांधणी झाली आहे.

कुणकेश्वर मंदिर : महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचं सांगितल जातं. महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजून गेला आहे.

औंढा नागनाथ : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग अशी औंढा नागनाथची ओळख आहे. देशभर ओळख असलेल्या नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची वर्दळ असते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला लाखो भाविक इथे हजेरी लावतात. नागनाथ मंदिर सुमारे 7 हजार 500 चौरस फूट क्षेत्रावर वसलंय. मंदिराच्या पूर्वेला हरिहर नावाचा तलाव आहे. काही आख्यायिकांनुसार हस्तीनापुरमधून 14 वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आलेल्या पांडवांपैकी युधिष्ठीर राजाने हे मंदिर बांधल्याचं सांगण्यात येतं. मंदिराच्या चहूबाजूला देव-देवतांच्या मूर्ती एका अखंड विशिष्ट दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. नागनाथाला दारुकावणे म्हणून संबोधलं जातं.

भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर इथंही महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. महाशिवरात्रीनिमित्त भीमशंकर इथल्या मंदिरात सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलीय. रात्रीपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकर इथं दर्शनासाठी दाखल झालेत.

बाबुलनाथ मंदिर : मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांची गर्दी होते. बाबुलनाथ मंदिर हे तीनशे वर्षांपेक्षा जुनं मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जवळपास तीन ते चार लाख लाखो भाविक बाबुलनाथच्या मंदिरात दर्शनासाठी येतात.

गोवा : प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या गोवा शाखेच्या वतीने शिवलिंगाचा हलता देखावा साकारण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बांदोडकर मैदानावर 108 शिवलिंग वापरण्यात आलीत. 26 फेब्रुवारीपर्यंत हा देखावा लोकांना पाहता येणार आहे.

सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लातूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती. मंदिरात गवळी समाजाच्या मानानुसार ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरात वाजत गाजत दुध दही तूप साखर आणि मध आणण्यात आले.  त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सर्वत्र हर हर महादेव आणि सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर महाराज की जय या जयघोषाने वातावरण दुमदुमले. पुढील काही दिवस येथील ग्रामदेवतेची यात्रा भरते.