बीड : कल्पकता आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड ही केवळ शहरी भागांमध्ये शिकणार्‍या मुलातच असते असं नाही तर ग्रामीण भागांमध्ये अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलंसुद्धा यात नक्कीच कमी नाहीत हे वारंवार सिद्ध होते. बीडच्या सुर्डी जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवीत शिकणाऱ्या महेश धांडे या विद्यार्थ्याने चक्क सोलर वर चालणारा ट्रक बनवला. त्यामुळे महेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेवराई तालुक्यातील सुर्डी जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणाऱ्या महेश धांडेने अडगळीला पडलेल्या वस्तू एकत्रित करून हा मिनी ट्रक बनवला आहे.


जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत असणाऱ्या महेशला मोठं होऊन इंजिनीअर व्हायचं आहे. यापूर्वीही त्याने अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. मात्र या सोलर एनर्जीच्या प्रयोगामुळे तो सध्या त्याचं कौतुक होत आहे. सध्या वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून महेशने शाळेत वापरात नसलेल्या एका सोलार प्लेटवर चालणारा ट्रक बनवला आहे.

महेशचे आई-वडील शेतकरी आहेत. महेश घरी असतानाही सतत काही ना काही तरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आईवडिलांना देखील त्याच कौतुक वाटत आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करताना तो घरातल्या जुन्या वस्तूचा वापर करतो वापरात नसलेले इलेक्ट्रिकच्या वस्तूंपासून तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो.


सध्या महेशच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षकांना ही अभिमान वाटत आहे. त्याने जेव्हा हा ट्रक शाळेत सरांना दाखवण्यासाठी आणला तेव्हा त्यांनाही हे पाहून आश्चर्य वाटलं. महेशने बनवलेला हा ट्रक आणि या सोलरपासून मिळणारी ऊर्जा त्यात निश्चित मर्यादा आहेत. ट्रॅक्टरची क्षमता आणि यासाठी वापरलेले उपकरणे यालाही मर्यादा आहेत पण महेशने आपल्या कल्पक बुद्धीने कोणत्याही इंधनाशिवाय साकारलेली ही ट्रक हा मोठा प्रयोग आहे. महेश सारखा प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अधिक बळ मिळालं तर याच विद्यार्थ्यांमध्ये आमचे उद्याचे संशोधक घडत आहेत असं म्हटलं तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही.