Healthcare Sector Maharashtra Budget 2022 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (11 मार्च) विधीमंडळात वर्ष 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. आरोग्य सेवांवर येत्या तीन वर्षात 11 हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे, असं त्यांनी सांगितलं. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी स्त्री रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसंच पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, जेणेकरुन सगळ्या उपचारपद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं.


कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कार्याचा सगळ्यांनीच कौतुक केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी सरकारची कामगिरी त्यांनी शायरीतून व्यक्त केली.


निष्ठेने केली सेवा ना केली कधी बढाई, दिला शब्द राज्याला, धैर्याने जिंकू लढाई


लढाई लढतानाही विजयाची जागवली आशा, देशाने पाहिलं अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा


आरोग्य क्षेत्रासाठी अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा.


- 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने - 8 कोटी खर्च


- नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी भांडवली खर्चासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी


- सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला रुग्णालये - हिंगोली, यवतमाळ, सांगली, सातारा, धुळे, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारणार 


- ग्रामीण भागातील रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देणार, 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन वर्षात सुरु करणार, त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद


- 60 शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची उपचारपद्धती


- आनंदीबाई जोशी यांना स्मरुण देशातील होतकरु विद्यार्थ्यांना इथेच प्रवेश मिळावा. मुंबईत सेंट जॉर्ज, नाशिक आरोग्य विज्ञान संस्था, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर संस्था उभारणार 


- पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार 


-  नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन टेक्नॉलॉजी- राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार


- जालना इथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे, या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.


- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढे ही सेवा उपजिल्हा रुग्णालयातही उपलब्ध होईल.  



राज्याच्या अर्थिक पाहणी अहवालात काय? 


अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.


आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 


अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्य सरकारने नोव्हेंबर 2021 पर्यंत 15 लाख 09 हजार 811 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 21 हजार 216 औद्योगिक प्रकल्प मंजूर केले. तसेच नोव्हेंबर 2021 पर्यंत 74 हजार 368 कोटी रुपयांच्या 258 प्रकल्पांची नोंदणी, सप्टेंबर 2021 अखेर राज्यात 9 लाख 59 हजार 746 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे या अहवालात सांगणायत आले आहे.