नवी दिल्ली :  देशात कोरोनाचे रुग्ण  वाढत असताना आता सरकारनं आता सध्या उपलब्ध असलेल्या दोन लसींपैकी एका लसीबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय. भारत बायोटेक या कंपनीच्या तिसऱ्या डोसला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. या बूस्टर डोसमुळे कोरोनाविरोधातली रोगप्रतिकारक क्षमता अधिक वाढेल असा दावा आहे..पण सोबतच सर्वांसाठी लसीकरण उपलब्ध व्हावं यासाठी सरकार अजूनही इतर लसींना परवानगी का देत नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. 


सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची को व्हॅक्सिन या दोनच लसींना देशात सध्या  परवानगी आहे. त्यातल्या भारत बायोटेकच्या तिसऱ्या बूस्टर डोसला काल औषध महानियंत्रकांकडून परवानगी देण्यात आली आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत हा तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. 


हा डोस सध्या क्लिनिकल फेज दोन मधल्या पेशंटलाच देणार आहे. म्हणजे या लसीची निर्मिती होत असताना सप्टेंबर, ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या पेशंटनी दुसरा डोस घेतला होता. त्यांनाच सध्या हा तिसरा डोस असेल. या बूस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि वर्षभर तुम्ही कोरोनापासून मुक्त राहाला असा वैज्ञानिकांचा दावा आहे. 


सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरु आहे. देशात गेल्या चोवीस तासात जवळपास 90 हजार केसेस वाढल्या आहेत. अशावेळी लसीकरण सर्वांसाठी खुलं व्हावं अशी मागणी केली जातेय. 16 जानेवारीला देशात लसीकरण मोहीम सुरु झाली. त्याला आता अडीच महिने झाले. पण अजूनही लस सर्वांसाठी उपलब्ध नाही. आधी फ्रंटलाईन हेल्थवर्कर्स, त्यानंतर 60 वर्षांपेक्षा अधिकचे वृद्ध त्यानंतर आता 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक अशा टप्प्यावर आपण पोहचलोय. 


सर्वांसाठी लस हे मिशन नेमकं कधी हातात घेणार?
    


केवळ कोवीशील्ड, कोव्हॅक्सिन या दोन लसींना परवानगी देऊन सर्वांसाठी लस हे मिशन पूर्ण होईल का?  रशियाची स्फुटनिक 5, अमेरिकेची फायझर, माँडेर्ना, जाँन्सन अँड जाँन्सन या लसी अजूनही देशात परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. यातल्या काही लसींची किमत जास्त आहे, पण ज्यांना परवडते त्यांना ती का मिळू नये असाही सवाल आहे.काही लसींसाठी अतिशीत तापमानाचीच आवश्यकता असते. त्या तुलनेत सीरम, बायोटेकच्या लसी 2 ते 6 डिग्री सेल्सियसमध्येही टिकतात. पण किमान देशातल्या काही महत्वाच्या शहरांमध्ये या कंपन्यांची शीतगृहं उभी राहू शकतात.


ज्या दोन लसींना परवानगी मिळाली त्या दोन्ही लसींमध्ये एक स्वदेशी अँगल आहे..सीरमची लस इंग्लंडच्या कंपनीच्या साहाय्यानं भारताताच बनलेली आहे. तर दुसरीकडे भारत बायोटेक ही तर संपूर्ण स्वदेशी अशी लस.कोरोनाच्या या महामारीत साहजिकपणे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येचं मार्केट लस कंपन्यांना खुणावत असणार.ज्यावेळी आपल्याकडे कोरोनाचा उद्रेक कमी होता, त्यावेळी परदेशी कंपन्यांना थोडं थांबवणं हे योग्यही वाटलं. पण आता सर्वांसाठी लसीकरण शक्य करण्यासाठी हे पर्याय उपलब्ध करुन देण्याचीही गरज निर्माण झाली आहे. 


 भारतात परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या या लसींची तुलनात्मक स्थिती काय आहे?



  • मॉडर्ना - दोन डोसमध्ये घेतली जाणारी ही लस 94 टक्के परिणामकारक असल्याचा दावा. या लसीची किंमत प्रति डोस 32-37 डॉलर आहे .साधारण 2500 रुपये प्रति डोस

  • फायजर-  ही सुद्धा दोन डोसमध्ये घेतली जाणारी लस आहे. 90 टक्के परिणामकारक आणि किंमत प्रति डोस 20 डॉलर म्हणजे साधारण 1500 रुपये रुपये प्रति डोस

  • जॉन्सन अँड जॉन्सन -  ही एकमेव लस आहे जी एका डोसमध्येच घेतली जाते.74 टक्के परिणामकारकता आणि किंमत प्रति डोस 10 डॉलर...म्हणजे साधारण 700 ते 750 रुपये


 देशात एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक वाढतच जाईल. त्यावेळी कोरोनाची ही लाट एकदम शिखरावर असेल असं म्हटलं जातंय...त्यामुळे सरकार लसीकरणाबाबतची आपली रणनीती नेमकी कधी बदलतंय हे पाहणं महत्वाचं असेल.