मुंबई : राज्यात आज कोरोना बाधित रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज तब्बल 27 हजार 126 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांचे निदान झाले आहे. मागील वर्षी कडक लॉकडाऊन असताना ज्या प्रकारे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. तिच वाढ सध्या मार्चमध्ये होत असल्याने सरकारसह प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरांमध्ये तर रोज नवीन उच्चांक गाठला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांनाच कडक निर्बंधांना सामोरे जावे लागणात असल्याची शक्यता आहे.
आज 13,588 रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.97% एवढे झाले आहे. दरम्यान, आज 92 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला. सध्या राज्यातील मतृयदूर 2.18% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,82,18,001 प्रयोगशाळा नमनुयाांपैकी 24,49,147 (13.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,18,408 व्यक्ती होम क्वॉरांटाईनमध्ये आहेत तर 7,953 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
पुणे जिल्ह्यात 5473 कोरोना रुग्णांची नोंद तर 27 रुग्णांचा मृत्यू. 23483 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे. पुणे जिल्ह्यात रोजची संख्या पाच हजारच्या पुढे गेली असली तरी अद्याप कोणतेही कडक निर्बंध लादण्यात आलेले नाही. मात्र, हे असच सुरु राहिलं तर येणाऱ्या काळात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत मिशन टेस्टिंग
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने 'मिशन टेस्टिंग' सुरु केलं आहे. यासाठी पालिकेकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.
लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या 20 ते 23 हजार टेस्ट दिवसाला होतायेत.