Winter Assembly Session Maharashtra : हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि आज ठाकरे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती तयार आहे. नोकरभरती, वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षेत झालेले घोळ यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती असणार आहे. काल भाजप आमदारांची आयोजित केलेल्या भोजनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय. दरम्यान परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे गेल्या सरकारशी जोडले गेले आहेत हे पुराव्यानिशी सादर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळं आज परीक्षा घोटाळ्यांवरुन सरकारची परीक्षा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 


हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती काल डिनर टेबलवर शिजली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर काल रात्री भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमात सरकारला कसं घेरायचं याबाबत फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केलं. नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्यावरून सरकारला घेरण्याची तयारी भाजपनं केली आहे. 


हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्‍या दिवशीही विरोधक आक्रमक राहण्याची दाट शक्यता आहे. विशेषता नोकर भरती मध्ये झालेला घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक राहतील. मात्र त्याच वेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा आक्रमक होतील आणि याची कुठेतरी धागेदोरे मागील सरकारच्या काळांमध्ये आहे, त्याचे पुरावे देण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे विज बिल संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी राखून ठेवायला सांगितलं त्यात नाना पटोले यांनी या सुरात सूर मिसळून ही राखून ठेवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा विज बिल संदर्भांमध्ये विरोधक आक्रमक होतील आणि त्याच वेळी अजित पवार यांनी उत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर यांच्याबद्दल अशिष शेलार यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य यावर ही शिवसेना आमदार आक्रमक होईल. 


पाहा व्हिडीओ : डिनर टेबलवर भाजप आमदारांची खलबत,परिक्षा घोटाळ्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती



विधानसभेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेले वक्तव्य यावरून कारवाई मागणी करणारी लक्षवेधी सूचना सेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी टाकली आहे. तर भाजप आमदार अमित साटम यांनी कोविड काळात मिरा-भाईंदर, भंडारा येथे रूग्णालयाला आग लागून मृत्यू झाल्याच्या घडल्या याची लक्षवेधी विशेष आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे. लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार आहे. 


विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या काय घेतल्या जातात याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयकं सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे. तसेच काल भास्कर जाधव यांनी केलेली मोदींची नक्कल आणि त्यानंतर भाजपची आक्रमकता यांमुळे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विशेष गाजला. अशातच आज पुन्हा विरोधक-सत्ताधारी एकमेकांसमोर येणार आहे. त्यामुळे आज सभागृहात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आज वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर मोर्चा


ओबीसींच्या जाती निहाय जनगणनेसाठी आज वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता सीएसटी ते मंत्रालय असा हा मोर्चा निघणार आहे. 


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह