रत्नागिरी :  वाशिष्ठी नदीतील गाळ काढावा लाल व निळी पूर रेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी चिपळूणवासियांनी आज चिपळूण बंदची हाक दिली आहे. रत्नागिरी संगमेश्वर,लांजा तालुक्यातून या बंदला पाठिंबा मिळाला आहे. शहरातील विविध संघटना स्वयंस्फूर्तीने बंद साठी सरसावल्या आहेत. 22 जुलै च्या महापुरानंतर वाशिष्टी आणि शिव नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. जुलै 2005 च्या महापुरानंतर या नदीतील गाळ काढलेला नाही. हा गाळ असाच राहिल्यास दरवर्षी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भावी पिढीच्या भवितव्यासाठी चिपळूणकरांनी मोठ्या जिद्दीने गाळ काढण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. शासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नाही त्यामुळे सोमवारी मूक मोर्चा काढला तर तत्पूर्वी भीक मांगो आंदोलन सुरू केले.


आज राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चिपळून बंद ठेवण्यात आले आहे. यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यात पाठींबा दिला आहे. तसेच बंदमध्ये रिक्षा व्यावसायिकांनी देखील होकार दिला आहे. हातगाडी,व्यावसायिक, टपरीधारक फेरीवाले,खोके धारक देखील बंदमध्ये सहभागी झाले आहेत. वाशिष्टीसह उपनद्यातील गाळ उपशाबाबत येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण आज सोळाव्या दिवशीही सुरूच आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ चिपळूण बचाव समितीने आज रोजी चिपळूण बंदची हाक दिली असून त्यात दुकाने, कार्यालय, रिक्षासह चार चाकी वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी निधीबाबत शब्द दिल्याने नागरिकांच्या नजरा बुधवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाकडे लागलेल्या आहेत. या संदर्भात मंत्रालय पातळीवर तसेच मंगळवारी येथे जलसंपदा विभागाचे  कार्यकरी मुख्य अभियंता विजय घोगरे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत ठोस तरतूद होत नाही आणि गाळ काढणे बाबतची गतिमान कार्यवाही दिसत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषण करत या समितीने केला आहे.
त्यामुळे भीक मागो आंदोलन, देशात मूक मोर्चानंतर समितीने आज चिपळूण बंदचे आवाहन केले.त्यामध्ये बाजारपेठ पूर्ण  बंद आहे. तसेच रिक्षा,चारचाकी वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चिपळूण बंद मध्ये केमिस्ट असोसिएशनही सहभागी झाले आहेत.