Chandrakant Patil : यशस्वी स्किल्ससोबत इतरही संस्थांना 'कमवा आणि शिका योजना' राबवता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव या योजनेला देण्याचा मानस असल्याचे पाटील म्हणाले. यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही पाटील म्हणाले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे आयोजित ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पाटील बोलत होते.


नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व


नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी  आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे. देशात पाश्चात्य देशांच्या तुलनेत  संशोधनाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याची गरज आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाटील म्हणाले. शासनाने कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेतला. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.


तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक 


पुढील वर्षापासून कौशल्य विकासाला चार क्रेडीट पॉइंट ठेवण्यात येणार असून ते पदवी मिळविण्यासाठी बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक घेऊन अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावा अशा सूचना पाटील यांनी दिल्या. कमवा आणि शिका योजनेला शासनाने अधिक व्यापक स्वरुप दिले आहे. एकीकडे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढते आहे,  रोजगाराचा मोठा प्रश्न शिक्षण क्षेत्रासमोर उभा आहे. या आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे होते. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेतल्याने रोजगार मिळविता येत नाही ही दुसरी बाजू आहे. या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक या योजनेच्या माध्यमातून करता येणे शक्य असल्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे म्हणाले. उद्योग जगतालादेखील स्पर्धात्मक युगात कमी खर्चात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे दोन्ही घटकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ होणार आहे.  


कमवा आणि शिका ही योजना १९ अभ्यासक्रमांसाठी सुरु


राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजना सुरूवातीच्या काळात ५ अभ्यासक्रमासाठी सुरू केली होती. त्यात वाढ करून १९ अभ्यासक्रमांनी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर म्हणाले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या धोरणानुसार याचा अभ्यासक्रम निर्धारीत करण्यात येणार आहे. शिकत असतानाच उद्योगांना अपेक्षित अभ्यासक्रमाची पदविका विद्यार्थ्यांना मिळविता येणार आहे. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आणखी अभ्यासक्रमाची भर घालण्याची शासनाची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि  उद्योग अशा दोघांनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगांनी या विद्यार्थ्यांची नीट काळजी घेऊन त्यांच्या प्रगतीला हातभार लावावा. या योजनेबाबत जागरुकता आणण्याचा प्रयत्न करावा. या योजनेच्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्व तयार होतील,  असेही ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune News :आळंदीत लोकसहभागातून शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार : चंद्रकांत पाटील


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI