Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यासह देशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीची पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
वादळी वाऱ्यासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान
भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. साकोली तालुक्यात वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतातील मका, गहू, भात पीक यासह बागायती शेती आणि पालेभाज्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात कुठे हलक्या, तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावलेली असतानाच आज गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वादळी वाऱ्यासह गारपीट
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यात वर्तविली होती. हा अंदाज खरा ठरत असून मंगळवारी दुपारपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी वारा सुरू होता. अखेर सायंकाळच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका गहू पिकांसह भाजीपाला पिकांना देखील बसणार आहे.
पवनार शिवारात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट
वर्ध्याच्या पवनार येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अनेक घरावरील टीनपत्रे उडाली, तर उभी झाडे सुद्धा कोसळली आहेत. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचा गहू आणि चणा पिक काढणी शिल्लक आहे, त्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस आणि गारपीट यामुळे केळीच्या बागेचं सुद्धा नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या या वादळ गारपिटीने मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.
कुठे पाऊस, कुठे गारपीट
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपीटसह जोरदार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत होता. एक दोन ठिकाणी किरकोळ गारपीटही झाली. मात्र पारशिवनी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार गारपीटही झाली. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे परिसरातील शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
वातावरणात अचानक बदल, मिर्ची पिकाला फटका
चंद्रपूर जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही भागात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊन अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली. हवामान विभागाने दोन दिवस जिल्ह्यातील वातावरण बदलाचे संकेत दिले होते. पावसाचा मिर्ची पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.