Maharashtra Weather Update : मिचॉन्ग चक्रीवादळात (Cyclone Michaung) देशासह राज्यात आजही पावसाची हजेरी (Rain News) पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहणार आहे, राज्यातील अनेक भागात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे.
राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता
महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
वर्ध्यात ढगाळ वतावरण; पावसाची शक्यता
अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचं नुकसान
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे मोठं संकट निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. त्यामुळे हे द्राक्षे घड काढून टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनाने याची दखल घेऊन भरीव आर्थिक मदत करावी आणि द्राक्ष उत्पादकासाठी कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत आहे. द्राक्ष घड फेकून देण्याची वेळ आल्याने यंदा द्राक्षाच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.
थंडीची प्रतीक्षा कायम
डिसेंबर महिना उलटला तरी हवी तशी थंडी पडलेली नाही. आधी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तर आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशासह राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मात्र, रडकुंडीला आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.