महाराष्ट्र : संपूर्ण राज्य पावसाची (Rain) प्रतीक्षा करत असताना भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, राज्यात 5 सप्टेंबरनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये.  सप्टेंबर सुरू होऊनही अद्याप राज्यातील काही धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठीचा पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पिके, जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोसमी पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.


कोकणात पावसाचा जोर वाढला


कोकणात शनिवार (3 सप्टेंबर) रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये तुरळक पाऊस बरसणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे शेतपिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


यवतमाळमध्ये पावसाची हजेरी


मागील 17 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सरुवात केली. मात्र रविवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी कुठे तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. या पावसामुळे खरीपातील  कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यावर्षी खरीप हंगामात 8 लाख 50 हजार  हेक्टर  लागवड झाली. जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे  3 लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते. 


हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये पाऊस


रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजली होती. पण या पिकांना या पावसाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पावसामुळे आनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या आहे. 


जर पाऊस पुढील काही दिवस पावसाचा जोर राहिला तर पाणीटंचाईचं संकट कमी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट ओढावलंय. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यभरात पावसाची प्रतीक्षा होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weather Update Today: कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पावसाची आशा, वाचा काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज