Maharashtra Monsoon Update: येत्या 72 तासांत मुंबईत मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच 29 जूनपर्यंत मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचं दिसून येईल. यंदा मान्सूनने भारतीय हवामान विभागाचा अंदाज पुन्हा पुन्हा चुकवला आहे. त्यामुळं विदर्भातल्या आज झालेल्या मान्सूनपूर्व सरींचा अपवाद वगळता महाराष्ट्रात अजूनही पावसाळा खऱ्या अर्थानं सुरु झालेला नाही. 


भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार 26 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाल्यास, तो आतापर्यंत सर्वात उशिरा दाखल होणारा मान्सून ठरेल. याआधी 2019 साली मान्सून 25 मे रोजी दाखल झाला होता. दरम्यान, पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पाऊस सुरु झाल्याचं चित्र दिसेल


जून महिना मान्सून अभावी कोरडा गेला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पावसाची मोठी अपेक्षा आहे. येणारा जुलै महिना पावसाच्या बाबतीत निर्णायक ठरू शकतो, कारण ऑगस्ट महिन्यात अल निनो सक्रिय होण्याची आणि त्यामुळं पाऊस पुन्हा गायब होण्याची भीती आहे. काही अपवाद वगळता वर्षानुवर्ष नियमित येणाऱ्या मॉन्सूनचा लहरीपणा अलिकडे वाढत चालल्याचं चित्र आहे. वारंवार येणारी चक्रीवादळे आणि मॉन्सूनचा बदललेला कालावधी याची साक्ष आहेत. यामुळे हवामान विभागाने स्वतःच्या ठोकताळ्यांमधे बदल करण्याची गरज आहे. कारण पाणी आणि शेतीचं सर्व नियोजन हवामान विभागाला प्रमाण माणूनच करण्यात येतं. 


विदर्भात आज मान्सूनने हजेरी लावली आहे. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात 25 तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 27 जून नंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात येऊ शकतो.


पावसाची परीक्षा, हवामान खातं फेल


हवामान विभागाने सुरुवातीला 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. मान्सून नेहमीप्रमाणे 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. मान्सून 7 जूनला कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. 9 जूनपर्यंत मान्सून पुणे, मुंबईसह  महाराष्ट्र  व्यापेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. मान्सून तळकोकणात 9 जूनला दाखल झाला खरा, मात्र मान्सून पुढे सरकला नाही. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सून आगमनाची 16 जून ही नवी तारीख वर्तवण्यात आली. नंतर मान्सून आगमनाच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आणि 23 जून ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. 23 जूनला काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली.