Heat wave : राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. राज्यातील तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवला आहे. तर कोकणात (konkan) आज उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं आंबा, काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे.
विदर्भात पावसाचा अंदाज
राज्यात उष्णतेत पुन्हा वाढ होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात चार ते सहा अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. आज कमाल तापमानात मोठी वाढ दिसणार आहे. तर दुसरीकडे विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभाागानं वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आठ आणि नऊ मार्च रोजी कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सियसने अधिक तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्यास फळांसह, भाजीपाल्यावर परिणाम होऊ शकतो. आंबा आणि काजूच्या पिकाला देखील वाढत्या उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे.
उष्णता वाढली, काय घ्याल काळजी?
दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका. विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) याचा वापर करा. त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा. घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका म्हणजे उन्हापासून बचाव होईल.
महत्त्वाच्या बातम्या: