Maharashtra Weather Forecast Today : उत्तरेत थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे देशासह राज्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, वीकेंडला पावसाची हजेरी पाहायला मिळेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. दरम्यान, आज वीकेंडला पावसाची शक्यता असून त्यानंतर उद्यापासून राज्यातील तापमान घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


राज्यात पुढील 24 तासात पावसाचा अंदाज


उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात कोरड्या हवामान दिसून येत आहे. पुढील 24 तास महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असून त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. या आठवड्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी-जास्त होत आहे. 


महाराष्ट्रात 'या' भागात पावसाची हजेरी


महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादला पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


राज्यात गारठा पुन्हा वाढणार


वेस्टर्न डिस्टबर्न्स आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभाव यामुळे पुढील आठवड्यात राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. वाऱ्यांची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. या सर्व स्थितीचा प्रभाव राज्यातील हवामानावरही पडेल. त्यामुळे पुढील आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.


किमान तापमानात लक्षणीय घट


सोमवारपासून राज्यातील किमान तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर प्रदेश दिल्लीसह उत्तरेकडील काही भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली होती.


सोमवारनंतर पुन्हा थंडी वाढणार


उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात 5 फेब्रुवारीपासून तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. किमान तापमान सुमारे चार अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारनंतर हवामान कोरडे आणि आकाश मुख्यतः निरभ्र राहील, असं आयएमडीने सांगितलं आहे. पुढील आठवडा हिच स्थिती कायम राहील.