मुंबई :   सत्तेतले नेते थेट कायद्याला आव्हान देऊ लागले आहेत.  गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांकडून कायदा हातात घेण्याची अनेक उदाहरणं घडली आहेत. आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर विरोधकांनी या प्रकरणांची पुन्हा एकदा उजळणी केलीय.  


राज्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना पाहिल्यानंतर  महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळलीय का? असा प्रश्न उपस्थित आहे. शुक्रवारी रात्री  उल्हासनगरमधलं हिल लाईन पोलीस स्थानकात भाजप आमदार गणपत गायकवाडांनी जमिनीच्या वादातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराच्या या घटनेवरुन विरोधी पक्षांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. 


सदा सरवणकरांकडून गोळीबार 


सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांनी कायदा हातात घेण्याचा सपाटाच लावलाय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा कायदा मोडल्याचा आरोप  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर झाला. दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. त्यातून उफाळलेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात सदा सरवणकर यांना मुंबई पोलिसांनी क्लिन चीट दिली. गोळीबार सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातून झाला, पण तो गोळीबार सरवणकर यांनी केला नाही असं पोलिसांनी म्हटलं..


आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाने केलं म्युझिक कंपनीच्या मालकाचं अपहरण


यानंतर कायदा मोडण्याची भाषा  शिंदेंच्या शिवसेनेचे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली. ठोकून काढा,  कापून काढा,हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो अशी मुक्ताफळं सुर्वे यांनी उधळली होती. आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यानंही एका म्युझिक कंपनीच्या मालकाचं अपहरण केलं. राजकुमार सिंह यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण केलीत्यानंतर राज सुर्वे फरार झाला. पण त्याच्यावरही कारवाई झालीच नाही. 


भाजपच्या सुनील कांबळेंची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण


भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. पुण्यातल्या कार्यक्रमात भर स्टेजवर हा प्रकार घडला. सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये ही मारहाण रेकॉर्ड झाली. तरीही मी मारहाण केलीच नाही असा दावा आमदार सुनील कांबळे यांनी केला.. 


हिंगोलीच्या खासदार डीनवर दादागिरी तर आमदार संतोष बांगर यांच्याकडून कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण


हिंगोलीचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनीही शासकीय रुग्णालयाच्या डीनवर दादागिरी केली. रुग्णालयातील अस्वछतेवरुन त्यांनी चक्क डीनच्या हातात झाडू देत शौचालयाची स्वच्छता करायला लावली. या प्रकरणात हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.  शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केली.  महिला शिक्षकांना त्रास देत असल्यानं आपण प्राचार्याला मारहाण केल्याचं बांगर यांनी म्हटलं होतं..


अब्दुल सत्तारांचा अपमानजनक प्रश्न तर नितेश राणेंचे चिथावणीखोर भाषण


अब्दुल सत्तार यांनी तर कहरच केला. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीत थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच अपमानजनक प्रश्न विचारला. सत्तार जिल्हाधिकाऱ्याला म्हणाले.. दारु पिता का? भाजप आमदार नितेश राणे यांनीही कायदा मोडण्याची भाषा केली. पोलीस माझं काहीही वाकडं करु शकणार नाहीत, कारण आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं राणे म्हणाले. माळशिरसमधल्या जनतेसमोर त्यांनी चिथावणीखोर भाषणही केलं


सत्ताधारी नेत्यांमध्ये कायदा मोडण्याची किंवा कायदा मोडण्याची भाषा करण्याची स्पर्धा सुरु झालीय.. या स्पर्धेत गणपत गायकवाडांनी पहिला नंबर काढलाय.  थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करुन गायकवाडांनी आपल्याच पक्षाकडे असणाऱ्या गृहखात्यालाच आव्हान दिलंय.


हे ही वाचा :


वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं; रागाच्या भरात पोलीस ठाण्यातच घडला थरार; गणपत आणि महेश गायकवडांमध्ये रात्री नेमकं काय झालं?