Maharashtra weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं कडाक्याची थंडी जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरअ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या म्हणजे 15 व 16 डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट येणारक आहे. राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
'या' भागात थंडीची लाट
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 5 चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे, ही तापमाने सरासरीपेक्षा 2 ते 6 डिग्रीपर्यंत खालावून जळगांव अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धाराशिव परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर वर्धा या सर्व जिल्ह्यात या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. सध्या जाणवत असलेली अपेक्षीत थंडी बुधवार दिनांक 18 डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यंत टिकून राहण्याची शक्यताही कायम आहे. खान्देशातील नंदुरबार धुळे जळगांव अश्या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं
पुढील काही दिवसातील पहाटे 5 चे किमान व दुपारी 3 चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे किमान 10 ते 12 तर कमाल 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते. दरम्यान, सध्या राज्यातील सर्वच ठिकाणी वातावरण बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी राज्यातील काही भागात पावासनं देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावले होते. कारण हा पाऊस फळपिकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळं द्राक्ष, डाळिंब केळी उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, सध्या राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं आहे. पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे काही दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असे खुळे म्हणाले. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे.