मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) थैमान पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं चांगलं झोडपलं आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचाही तडाखा बसला आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात गेल्या 24 तासात अवकाळी पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 जणांना जीव गमवावा लागला आहे.
नागपुरात वीज पडून दोघांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत आलागोंदी येथे आज दुपारी दोन वाजता एका पळसाच्या झाडावर वीज पडून कंदुरीच्या कार्यक्रमासाठी शेतात आलेल्या दोघांच्या जागीच मृत्यू झाला आहे. भगवंतराव भोंडवे (वय 50) राहणार उदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती आणि जयदेव मानोटे (वय 55) राहणार प्रभातपट्टण जिल्हा बैतूल मध्य प्रदेश अशी मृतकाची नावं आहेत.
नातेवाईकांकडे आलेल्या दोघांचा मृत्यू
कोंढाळी जवळच्या आलागोंदी येथील गोविंदराव पंचभाई यांच्या शेतात रविवारी कंदुरीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी शेतात आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दुपारी दोन वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला पावसापासून बचावासाठी कार्यक्रमाला आलेले लोक झाडाखाली थांबले त्यातच भगवंतराव भोंडवे आणि जयदेव मानोटे एका पळसाच्या झाडाखाली थांबले होते या फडसाच्या झाडावर वीज पडून दोघांच्या जागीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरमधील दोघांना जीव गमवावा लागला
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट पाहायला मिळाला. तर अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील दोघांना जीव गमवावा लागला आहे. लाडसावंगी परिसरातील अंजनडोह येथे वीज पडून तातेराव आगाजी शिनगारे या वृद्धाचा, तर फुलंब्री तालुक्यातील आडगाव येथे वादळी वाऱ्यामुळे उडालेल्या पत्र्याच्या खाली दबून प्रल्हाद दलसिंह बारवल या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यात पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
घराची भिंत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू
फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील रहिवाशी प्रल्हाद दालसिंह बारवाल हे विहिरीचे काम करण्यासाठी जात असताना जोराचे वादळी वारे आणि पाऊस चालू झाल्याने त्यांनी एका घराचा आसरा घेतला, त्याचवेळी घराचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गावातीलच दुसऱ्या घटनेत कैलास भूमी यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास फुलंब्री तालुक्यात अवकाळी पावसानं चांगलंच थैमान घातलं आहे.
इलेक्ट्रिक बाईकवर दुचाकी कोसळून एकाचा मृत्यू
इलेक्ट्रिक दुचाकीवर वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक विद्यार्थी जागीच ठार झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्यातील फलटण येथील शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर ढोले असं मृत विद्यार्थाचे नाव आहे. तर, ऋषिकेश भिसे आणि विक्रम धायगुडे हे दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. इलेक्ट्रिक बाईकवरुन जात असताना सरडे गावाजवळ ही घटना घडली.