Maharashtra Weather News : राज्यात सध्या अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर वाढला आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासाह वादळी पाऊस सुरु आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. दरम्यान, हा अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस राहणार आहे? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिली आहे.


सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार?


पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील. ठिकठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील पाऊस पडणार आहे. मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहिल असा अंदाज आहे.


पाऊस ऊस पिकासाठी खूपच फायदेशीर ठरणार


पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्तीचा पाऊस राहणार आहे. कोकणात सुद्धा मोठा पाऊस पडणार असा अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे हा पाऊस ऊस पिकासाठी खूपच फायदेशीर ठरणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे. 17 तारखेपर्यंत या भागात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. मात्र 18 मे नंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. 


शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी


पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची तथा पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका


दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसतोय. अनेक ठिकाणी फळ बागांचे तसेच भाजीपाला पिकांच मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी घरांचं  देखील नुकसान झालं आहे. अशातच आणखी आठवडाभर राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन देखील करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी