Lok Sabha Election 2024 शिर्डीअठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्पासाठी आज मतदानाची रणधुमाळी पार पडते आहे. आज, 13 मे रोजी राज्यातील उर्वरित 11 लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळपासूनच राज्यातील अनेक मतदारसंघात मतदारांनी गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यामधील घोळ, निवडणूक यंत्रात बिघाड, इत्यादि अडचणीसह काही ठिकाणी काही गैरप्रकार होत असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत.


असाच एक प्रकार शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) पुढे आला आहे. यात मतदान केंद्रावर असलेल्या बुथवरील निवडणूक अधिकारीच गोपनीयतेचा भंग करत असल्याचा आरोप एका मतदाराने केला आहे. या प्रकारामुळे मतदानकेंद्रावर काही काळ गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा गोंधळ मिटवला आहे. 


गोपनीयतेचा भंग करत असल्याचा आरोप


शिर्डी लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिलासादायक चित्र आहे. अशातच, शिर्डी शहरातील साईनाथ विद्यालयात 45 नंबर बुथवर गोंधळ उडाल्याचे पहायला मिळालय. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदाना दरम्यान साईनाथ माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदार आणि अधिकारी यांच्यात वाद झाल्याने मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. यावेळी बुथचे केंद्राध्यक्ष हे मतदार कुणाला मतदान करताय हे बघत असल्याची तक्रार दत्तात्रय आसने यांनी केलीय. मतदारांच्या तक्रारीनंतर या परिसरात काहीसा गोंधळ उडाल्याच पाहायला मिळालं. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा गोंधळ मिटवलाय.


गैरप्रकार लक्षात आणून देऊनही कारवाई नाही


शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 45 नंबर बुथवरील मी एक मतदार आहे. ज्यावेळी मी मतदान करण्यास गेलो असता, मतदार केंद्रावरील अधिकारी मागून मतदान कुणाला केले हे पाहत असल्याचे निदर्शनात आले. याबाबत मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा करत बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकारची तक्रार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ऑनलाईन तक्रार करण्याचा सल्ला दिला.


एकुणात ज्या निवडणूक अधिकाऱ्यांवर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जाबाबदारी असते तेच असे प्रकार करत असतील तर ही खेदजनक बाब असल्याचे मत दत्तात्रय आसने या मतदाराने व्यक्त केले आहे. एकीकडे निवडणूक आयोग मतदानाचे आवाहन करत आहे. मात्र, सुरू असलेल्या गैरप्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देऊनही जर साधी दखलही घेतली जात नसेल तर हे फार संतापजनक असल्याचे मतही दत्तात्रय आसने यांनी बोलून दाखवले आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या