Maharashtra Weather : सध्या राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. कुठं उन्हाचा चटका लागत आहे, तर कुठे थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान, राज्यात हळूहळू 'ऑक्टोबर हीट मावळतीकडे तर पहाटेचा गारवा उगवतीकडे' जात असल्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात आजपासून (26 ऑक्टोबरनंतर) अपेक्षित असलेल्या ऑक्टोबर हीटचा उतरतीकडे कल जाणवू लागला आहे. सध्या पहाटेच्या गारव्यात कमालीची वाढ झाल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
राज्यातील तापमानात घट
संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा कमी जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिकपासून सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात 2 ते 5 डिग्रीने कमी खालावले असून कमाल तापमानही मात्र सध्या सरासरी इतके जाणवत आहे. तरीदेखील ईशान्य वाऱ्याचा वाढता जोर आणि उत्तर भारतात जोरदार बर्फबारी या अभावी महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली असे अजुन तरी म्हणता येणार नाही. परंतु निरभ्र आकाश आणि कमी होत असलेली आर्द्रता आणि उच्चं दाब क्षेत्राची खालावत असलेली घनता ह्यामुळं महाराष्ट्रात नकळत उन्हाची काहिली कमी झाली आहे. वातावरण ऊबदार जाणवत आहे. प्राथमिक अवस्थेतील रब्बी पिकांसाठी ही वातावरणीय परिस्थिती आल्हाददायक भासत आहे.
राज्यात पावसाची शक्यता नाही
सध्या राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. राज्यात यावर्षी अपेक्षेपक्षा कमीच पाऊस झाला आहे. बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकरी परतीच्या पावसाच्या प्रतिक्षेत होते मात्र, परतीचा पाऊस देखील राज्यात झाला नाही. यामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या काळात महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारे पावसाची शक्यता नाही.
अरबी समुद्रात 'तेज' चक्रीवादळ
अरबी समुद्रात 'तेज' चक्रीवादळ तयार झाल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर सध्या कमी दाबाची प्रणाली सक्रिय असून तिची तीव्रता सातत्याने वाढत आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला कोणताही तत्काळ धोका नसल्याची ग्वाही हवामान खात्याने दिली. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात थंडी सुरु झाली आहे. पुणे आणि आसपासच्या भागात येत्या आठवडाभरात कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात राज्यात किमान तापमानात अंदाजे 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित खाली घसरलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: