Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, उद्यापासून (7 डिसेंबर) राज्यातील वातावरण कसं असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण आहे. तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा 6 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून म्हणजे 8 डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळून थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे.  


13 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यता


अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोमवार म्हणजे 11 डिसेंबर ते बुधवार दिनांक 13 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेशणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस आणि बर्फबारीमुळं तेथील सकाळची दृश्यता खालावली असून तिथे थंड वातावरण आणि धुके जाणवत आहे. 


दरम्यान, शुक्रवारपासून (8 डिसेंबरपासून) सुरु होणाऱ्या थंडीला अडथळाही आता दूर होऊन पूरकता मिळू शकते. त्यामुळं महाराष्ट्रातील फळबागांना होणारा धोका, लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा लागवड यासारख्या शेतकामांसाठीची गैरसोयही टळू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


चक्रीवादळ मिचॉन्गचा हवामानावर परिणाम


चक्रीवादळ मिचॉन्गचा देखील हवामानावर परिणाम झाला आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मिचॉन्ग चक्रीवादळ आदळलं आणि कमकुवत झालं. चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील बापटलापासून 25 किमी पश्चिम-वायव्येस आणि ओंगोलच्या 60 किमी उत्तर-ईशान्येस दक्षिण किनारपट्टी भागात धडकलं. चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. याचा देखील हवामानावर परिणाम होत असून काही भागात पाऊस पडत आहे. 


आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस 


मिचॉन्ग चक्रीवादळामुळं देशातील काही राज्यात पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. चेन्नई, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये झाडे कोसळणे आणि विजेच्या धक्का लागण्याच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update Today: सोसाट्याच्या वाऱ्यांनंतर दिल्लीत गोठवणारी थंडी, कसं असेल उत्तर भारतातील हवामान? महाराष्ट्रावर परिणाम होणार?