Maharashtra Weather News : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. एका बाजूला उष्णता आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी किती दिवस राहणार याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे 18 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचे खुळे म्हणाले.
महाराष्ट्रातील (संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ) अश्या 29 जिल्ह्यात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे 18 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत अवकाळी (गडगडाटीसह वीजा, वारा, गारा व धारा सह ) पावसाची शक्यता जाणवते. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणत्या भागात व कोणत्या दिवशी गारपीटीच्या शक्यता?
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजे शनिवार दि.11 ते मंगळवार दि.14 मे असे चार दिवस संपूर्ण विदर्भ मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ) अशा 29 जिल्ह्यात मध्यम अवकाळी( गडगडाटीसह वीजा, वारा व गारा) पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे. रविवार दि. 12 ते मंगळवार दि.14 मे पर्यंतच्या 3 दिवसात कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली ह्या आठ जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीच्या शक्यतेची तीव्रता अधिकच जाणवू शकते.
मुंबईसह कोकणातही अवकाळीची शक्यता वाढली आहे काय?
आजपासून म्हणजे शनिवार दि. 11 ते गुरुवार दि. 16 मे पर्यंतच्या सहा दिवसात मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यातही आता ढगाळ वातावरण राहून अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमान 33 व 25 डिग्री से. राहणार
दरम्यान, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे पर्यंतच्या आठवड्यात मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमान सरासरी इतके म्हणजे 33 व 25 डिग्री से. ग्रेड तर उर्वरित महाराष्ट्रात ते 40 व 26 डिग्री से. ग्रेड दरम्यान असणार आहे. उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता सध्या महाराष्ट्रात जाणवणार नाही, असे वाटत आहे.
अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रात कश्यामुळे वाढली?
पश्चिम उत्तर प्रदेशातील मध्यभागातील क्षेत्रात समुद्रसपाटीपासून दिड किमीवर उंचीपर्यंत तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसाममधील हाफलॉंग व सिल्चर पर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंतच्या पातळीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या आस व त्यामुळं दोन्हीही समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे पावसाची स्थिती निर्माण झालीय. तसेच मराठवाडा ते कन्याकुमारी पर्यंतच्या वारा खंडितता प्रणाली व त्यातून तयार झालेला 900 मीटर उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे पावसाची स्थिती निर्माण झालीय.
मतदानासाठी वातावरणीय दक्षता घेण्याची गरज आहे का ?
महाराष्ट्रातील लोकसभा चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (13 मे) रोजी होणार आहे. त्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता अधिक आहे. त्यामुळं मतदारांनी विशेषतः सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान उरकल्यास, त्यांना अवकाळी वातावरणाचा कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नाही.
महत्वाच्या बातम्या: