Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. या पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडे पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळं राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईतही जोरदर पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. 


 




ठाण्यात जोरदार पाऊस


ठाण्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं गुन्हे शाखेचे आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाणी शिरलं आहे. सेक्शन पंपाद्वारे पाणी उपसण्याचे काम सुरु आहे. पोलीस मैदानात देखील तलावाचे स्वरूप आलं आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.


पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस


पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळं सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. बोईसरच्या पूर्वेला टाटा हाउसिंग परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुडघाभर पाण्यातून काहींना धक्का मारत गाडी नेण्याची वेळ आली आहे.


रत्नागिरी 


रत्नागिरी-खंडाळा, जयगड परिसरात पाऊसाचा जोर वाढला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळं अनेक भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. 


भिवंडीत जोरदार पाऊस


भिवंडीत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.


देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस


देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. तर डोंगराळ भागात  पावसामुळं नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागात उद्यापर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update : देशातील बहुतांश राज्यात मुसळधार पाऊस, उद्यापर्यंत जोर कायम राहणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज