Maharashtra Weather : वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. याच शेती पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, सध्या राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. गारठा वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, आजपासून (21 डिसेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे. तर दुपारच्या कमाल तापमानात घट होवून ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावू शकते असंही त्यांनी सांगितले आहे.
डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10 दिवसात थंडीचा कडाका वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. आजपासून थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळं राज्यात थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे.त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे. डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10 दिवसात थंडीत चांगलीच वाढ होणार आहे. ही थंडी कदाचित शनिवार (31 डिसेंबर) पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
परभणीचा पारा घसरला, तापमान 10.01 अंशावर
परभणी जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा थंडी परतली आहे. तापमान हे 10 अंशावर आले आहे.आज जिल्ह्याचे तापमान हे 10.01 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. घसरलेल्या तापमानामुळं सर्वत्र थंडीचा कडाका जाणवतोय. गहू, हरभऱ्यासाठी ही थंडी पोषक आहे. गारठा वाढल्यामुळं परभणीकरांना शेकोटी आणि उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय
21 ते 31 डिसेंबर या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही
बंगालच्या उपसागरातील सध्या श्रीलंका पूर्व किनारपट्टीवर असलेले तामिळनाडूकडे येत असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या वातावरणाचाही महाराष्ट्रात जाणवणाऱ्या या थंडीवर विशेष काही नकारात्मक असा परिणाम जाणवणार नाही. 21 ते 31 डिसेंबर या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यताही जाणवत नाही. महाराष्ट्रासारखीच थंडीचा परिणाम दक्षिण गुजरातमधील (द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाडपर्यंतच्या) 20 जिल्ह्यात तसेच दक्षिण मध्य प्रदेशातीलही (झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुल पर्यंतच्या) 20 जिल्ह्यात जाणवू शकतो, असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम (Impact on health) होताना दिसत आहे. नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: