Maharashtra Weather Update : देशासह राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पहाटे कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. नाशिक, निफाडमध्ये गारठा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भातही तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.


पुढील तीन दिवस पावसाची शक्यता 


महाराष्ट्रात पुढील तीन दिवसाची तुरळक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22, 23 आणि 24 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रातही पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असा अंदाज आयएमडीने म्हटलं आहे. गडचिरोली, चंद्रपूरला पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 48 तासात उत्तर भारतात दाट धुके आणि तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातह पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 


उत्तर भारतात थंडीची लाट


उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. पंजाब आणि त्रिपुराच्या काही भागात दाट धुके दिसून येत आहे. हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मध्यम धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. 22 ते 23 जानेवारी दरम्यान मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र थंडी असण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागात 22 तारखेला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. 23 ते 25 जानेवारी देशात विविध भागात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे. 22 जानेवारीला उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता आहे. 


उत्तर भारतातील थंडीचा राज्याच्या हवामानावर परिणाम


उत्तर भारतात थंडीचा गारठा वाढत असून तेथे काही राज्यात थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा कमी कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत आहे. राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानेही वर्तवला होता. 


मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमानात घट होत आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.