मुंबई : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. सध्या उन्हाळा सुरु असला तरी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाची हजेरी पाहायला मिळत आहे. काही भागात अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरात उष्णतेमुळे नागरीक हैराण झाले आहेत. राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे.


महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.या भागात तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहील. त्याशिवाय, लातूर आणि उस्मानाबादसह इतर दोन मतदारसंघात तात्पुरती विश्रांती अपेक्षित आहे, कारण दोन्ही भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट 


कोकणातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज, हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, हातकणंगले येथे तापमान 33 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या भागातील तापमान सामान्य पातळीपेक्षा 1.4 ते 2 अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे.


विदर्भात हवामान कसं असेल?


आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन दिवस जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी 10 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.