18 March Headlines : लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. परंतु, मुक्काम हलावयचा की नाही त्याचा निर्णय आज शेतकऱ्यांशी चर्चा करून घेऊ अशी माहिती माजी आमदार जे पी गावीतांनी दिलीय. त्यामुळे शेतकरी आपला लाँग मार्च मागे घेणार की सुरू ठेवणार हे आज ठरणार आहे. 


सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस


जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. संपावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याने हा संप अजून सुरूच आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपावर कायम आहेत. 


शेतकऱ्यांचा लाँग मार्च मागे घेणार की सुरू ठेवणार आज ठरणार 


लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. परंतु, मुक्काम हलावयचा की नाही त्याचा निर्णय आज शेतकऱ्यांशी चर्चा करून घेऊ अशी माहिती माजी आमदार जे पी गावीतांनी दिलीय. सरकारच्या अश्वासनांवर भरोसा नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. शिष्टमंडळातील काही लोकांचे म्हणणे आहे की निर्णयची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चाची माघार नको. त्यामुळे विधानभवनातील शिष्टमंडळ आता मोर्चा स्थळी गेल्यावर नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


 वाशिममध्ये प्रशासन आणि जैन पंथीयांसोबत बैठक


जिल्हा प्रशासन, पोलीस आणि दोन्ही जैन पंथीयांसोबत बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आज परत बैठक होणार आहे. पार्श्वनाथ मंदिराला पुन्हा टाळे लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. एबीपी माझाने बातमी दाखवताच प्रशासनाने पुढाकार घेतला होता. आजच्या बैठकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाचं उद्घाटन 


नाशिकमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला आज नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे, छगन भुजबळ हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांच्या पुढाकारातून स्मारक उभारण्यात आलं असून 11 एप्रिल 2018 रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यां हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरच्या परिसरामध्ये 400 मीटर जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 26 फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. 85 एलईडीची आकर्षक रोषणाई करण्यात आली असून रोषणाई सौरऊर्जेवर चालणार आहे. 



सोलापुरात  शासकीय कर्मचाऱ्यांचे भिक मागो आंदोलन


 सोलापुरात शासकीय कर्मचारी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून लक्षवेधनाचे प्रयत्न करत आहेत. आज जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचात्यांचा मोर्चा निघणार आहे. सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. सोबतच शासकीय कर्मचाऱ्यांकडून भिक मागो आंदोलन देखील केले जाणार आहे.