महाराष्ट्र :  भर पावसाळ्यातही (Rain) राज्यातील (Maharashtra) पिण्याची पाण्याची (Water) वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात तब्बल 369 टँकर्सने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास 350 गावे आणि 1399 वाड्यांमध्ये टँकरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येत आहे. मागील वर्षी याच दिवशी राज्यभरात फक्त 10 गावं आणि 14 वाड्यांना आठ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र पाऊस दडी मारुन बसल्यानं टँकरच्या संख्येत जास्त भर पडली आहे. 


कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सने पाणीपुरवठा सुरू


राज्यभरात जवळपास 350 गावे आणि 1399 वाड्यांमध्ये 369 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यांना मिळून 153 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी पुणे जिल्ह्याला 40 टँकर्स, सातारा 40 टँकर्स, सांगली 29 टँकर्स आणि सोलापूरमध्ये 10 टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 


तर नाशिक विभागामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये 141 गाव आणि 392 वाड्यांना 127 टँकर्सने पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 58 टँकर्स, जळगाव 14 टँकर्स आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये 55 टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 57 गावं आणि 22 वाड्यांना 84 टँकर्सने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरला 41 टँकर्स आणि जालनामध्ये  43 टँकर्सने पाणीपुरवठा सुरु आहे. 


'या' आठवड्यांमध्ये टँकरच्या संख्येत वाढ


यामध्ये अमरावती विभागातील आणि कोकण विभागातील परिस्थिती ही दिलासादायक आहे. कारण अमरावती विभागामध्ये फक्त बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाच टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कोकण विभागातील एकाही जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाहीये. टँकर्सची ही संख्या मागील आठवड्यांमध्ये  351 होती मात्र या आठवड्यात हीच संख्या 369 वर गेली आहे. त्यामुळे राज्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे. 


दरम्यान राज्यात जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर उर्वरित भागांमध्ये देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. आधीच बळीराजावर संकट आस्मानी संकट आहे,  त्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गाव खेड्यातील लोकांना आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे वरुणराजाला संपूर्ण महाराष्ट्र आता साकडं घालत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पाणीटंचाई! पाण्याच्या बचतीसाठी अर्ध्या गावाने अंघोळ करणं सोडलं; मराठवाड्यातील भीषण वास्तव