मुंबई : नव्या सरकारचं दुसरं अधिवेशन पार पडलं पण विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच नाही. भास्कररावांनी जंग जंग पछाडलं, जयंतरावांनी मन वळवण्याचा प्रयत्न करुन पाहिला, नानांनी गमंतीगंमतीत विषय काढून पाहिला पण सत्ताधाऱ्यांना काही पाझर फुटलाच नाही. विरोधी पक्षनेत्याची खुर्ची आणखी काही काळ मोकळी राहणार असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनीही देऊन टाकले.

महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. दोन दोन अधिवेशनांचं सूप वाजलं. विधानपरिषदेला नवे सभापती मिळाले. विधानसभेलाही नवे उपाध्यक्ष मिळाले. पण विरोधक ज्याकडे डोळे लावून बसले होते ते विरोधी पक्षनेपद मात्र रितेच राहिलं. यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांची खंत आणि सरकारची तितकीच थंड भूमिका समोर आली.

भास्कर जाधव भावनिक

विरोधकांनी विरोधी पक्षनेता ठरवला असला तरी त्यांच्याकडे 288 पैकी 50 जागासुद्धा नाहीत. त्यामुळे या मुद्द्यावर विरोधक विरोधक सरकारच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या मर्जीवर अवलंबून आहेत. याच अधिवेशनात विरोधी पक्षनेपदाची खुर्ची मिळेल अशी आशा भास्कर जाधवांना होती. पण सरकारच्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास फोल ठरला आणि एकाच वेळी ते भावनिक झाले आणि त्यांचा भडकाही उडाला.

विरोधकांचा सत्ताधाऱ्याना सवाल

निकाल लागला तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. किमान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी सरकारनं विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय घ्यावा यासाठी विरोधक आग्रही होते. सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. तर आम्ही काय गुन्हा केला आहे सांगवं. आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेतेपद देता येत नसेल तर अध्यक्षांनी तसं लिहून द्यावं असं अनिल परब म्हणाले.  

सत्ताधाऱ्यांकडून नियमावर बोट

सरकारकडून रोखठोक अजितदादांनी नियमांवर बोट ठेवलं. विरोधी पक्ष नेता निवड आमच्या हातात नाही असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं. तर विरोधी पक्षनेत्याची खुर्ची थोडावेळ मोकळी राहू द्या असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्ट संकेत दिले. याच मुद्द्यावरून उदय सामंतांनी भास्कर जाधवांना चिमटा काढून घेतला. 

पुढची पाच वर्षे विरोधी पक्षनेत्याविनाच? 

अशा प्रकारे महायुती सरकारचे आणखी एक अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडलं. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्व माहिती आहे असं महायुतीचे नेते एकीकडे सांगत असतात. तर दुसरीकडे विरोधकांना गाजर दाखवत झुलवत ठेवताना दिसतात. लोकसभेत 10 वर्षs विरोधीपक्ष नेता नव्हता तसंच चित्र पुढची 5 वर्ष विधानसभेत पाहायला मिळेल की काय, अशी शंका घेतली जात आहे. 

 

ही बातमी वाचा: