मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, राजकीय वातावरण ढवळून निघालं. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणं, शेरेबाजी करणं तर कधी व्यक्तिगत टीकेची पातळी घसरणं हे आता जणू नित्याचंच झालं आहे. त्यात सोशल मीडियाच्या एन्ट्रीने कहानी मे नवीन ट्विस्ट आला. याचा लेटेस्ट एपिसोड म्हणजे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं नवं गाणं आणि त्यातून सुरु झालेला वाद. लोकांचे प्रश्न मांडायच्या मंचावर अर्थात राज्य सरकारच्या अधिवेशनातही हाच मुद्दा अगदी अखेरच्या दिवशीही गाजला.
गेल्या आठवड्यापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत औरंगजेब कबर, कोरटकर-सोलापूरकर, खोक्या, दिशा सालियन ही प्रकरणं गाजत होती. मात्र कुणाल कामरानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन केलं आणि या गाण्यानंतर कुणाल कामरानं औरंगजेब कबर, कोरटकर, दिशा सालियन या सगळ्या प्रकरणांना काहीसं मागे पाडलं.
राजकीय राड्यानंतरही, दररोज वेगळं गाणं शेअर करणारा कुणाल कामरा जेवढा सोशल मीडियावर गाजतोय तेवढाच किंबहुना त्यापेक्षा किंचित जास्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात गाजला. कारण कुणाल कामरा आणि त्याचं गाणं माध्यमांसमोर पुन्हा सादर करणाऱ्या सुषमा अंधारेंविरोधात सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला.
भाजपच्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे आमदार अनिल परबांवर केलेल्या टीकेवर बोट ठेवत, त्यांच्यावर हक्कभंग का नाही असा प्रतिसवाल सुषमा अंधारेंनी विचारला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा आरोप करताना, त्यांच्यावर हक्कभंग आणणं शक्य आहे का अशी विचारणाही केली.
कुणाल कामरानं त्याच्या गाण्यात शिंदेंना गद्दाराचं लेबल लावलं. कामराच्या विडंबन गीताला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी शेरोशायरीचा आधार घेतला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, काही शेख चिल्ली स्वप्ने पाहताहेत, त्या सर्वांना गेटवेल सुन अशा शुभेच्छा देतो. तुम लाख कौशिसे कर लो हमे गिराने की, हम ना बिखरेंगे कभी, उलटा दुगनी रफ्तार से निखरेंगे.
'सत्य परेशान हो सकता है पराजित नही हो सकता, जो हमतक पोहोच नही सकते वो हमको क्या गिराएंगे, हम से दुश्मनी करने से पहले अपना कद बढा लो, बराबरी होगी तो मुकाबले मे मजा होगी, पहले विचार से बडे हो जाओ, डुब गए अहंकार में कोई सारे अब तो सुधर जाओ प्यारे' अशा अनेक शायरींचा आधार घेत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलं.
कुणाल कामराला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. त्याच आरोपाचा पुनरुच्चार करताना एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर आसूड ओढला. ते म्हणाले की, "तुम्ही गद्दार गद्दार म्हणून ठोकत बसा, पण गद्दार कोण आणि खुद्दार कोण आहे याचा निकाल जनतेने दिला आहे. आरशात बघून वारसा सांगता येत नाही. सुपाऱ्या देवून बदनामीच्या मोहिमा सुरु आहेत, त्याने काही फरक पडणार नाही. काही पाखंडी लोकं पुढे करुन काही शीखंडी लोकं आधार घेत आहेत."
कुणाल कामराच्या गाण्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांशी भिडवून दिलं. दररोज वेगळं गाणं शेअर करत कुणाल कामरा हा सगळा राजकीय तमाशा पाहत बसला आहे. तर पोलीस यंत्रणा कुणाल कामरा चौकशीला कधी हजर राहतोय याची वाट पाहत समन्स बजावण्याचे सोपस्कर पार पाडत आहेत.
कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी आणखी एक झटका दिला आहे. चौकशीसाठी हजर होण्यास मला एक आठवड्याचा वेळ द्यावा अशी विनंती कामरानं केली होती. मात्र पोलिसांनी त्याला दुसरं समन्स पाठवलं आहे. दरम्यान खार पोलिसांनी हॅबिटॅट स्टुडिओशी संबंधित अनेकांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत.
आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाचं खरंच पुढे काही होणार का? या प्रश्नाचं ठोस उत्तर देता येत नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्की की कुणाल कामरा सलग तिसऱ्या दिवशी चर्चेत राहिला आणि कामराच्या निमित्तानं त्यानं सरकारवर केलेलं विडंबनही.
ही बातमी वाचा: