मुंबई : वरळी विधानसभेचे शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde)  यांना शिवसेनेकडून विधान परिषदेचं तिकीट देणार  आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती. आता विधानसभा सदस्य एक जागा रिकामी होत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेच विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सूत्रांनी दिली आहे.


विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि मिलिंद नार्वेकर, राहुल कनाल आणि सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत होती. मात्र, या जागेसाठी सुनील शिंदे यांचं नाव शिवसेनेतून फिक्स झाल्याचं सांगितलं जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिंदे यांनी आपली जागा सोडली होती.


महापालिका स्वराज्य संस्थामधून शिवसेनेचे एक आमदार विधानपरिषदेवर पाठवला जातो. या जागी रामदास कदम यांना 2016 साली पाठवले होते. मात्र शिवसेना नेते रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचं सांगितलं जातं. रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच शिवसेनेतून तरुण नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.त्यात आता सुनील शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.


कोण आहेत सुनील शिंदे? 


शिवसैनिक ते आमदार असा सुनील शिंदे यांचा प्रवास राहिला आहे. 2007मध्ये ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली होती. 2015मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन भाईंची जागा धोक्यात?


Vidhan Parishad Election : कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या विरोधात कोण? भाजपचा उमेदवार कोण असणार?


विधानपरिषदेतील आठ जागांवर कुणाची वर्णी? नवीन चेहरे येणार की जुन्याच चेहऱ्यांना संधी