Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदांच्या निवडणूक निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडली. भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप होत असताना भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या विजयाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार पलटवार केला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर ईव्हीएम मशीन चांगलं असतं, आसाममध्ये भाजप जिंकले तर ईव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो. हे जिंकले तर तत्वज्ञान जिंकतं आणि आम्ही जिंकलो तर घोडेबाजार जिंकला असा तर्क देतात असे म्हणत आम्ही घोडेबाजार केला नाही. पण, महाविकास आघाडीचे पैसे संपले काय, असा उलट प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी अमोल मिटकरी यांना केला. 


पाटील यांच्या या तिरकस प्रश्नाला उत्तर देताना मिटकरी यांनी आमच्याकडे दोन नंबरचा पैसा नाही असे म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी त्यावर व्वा...व्वा...मिटकरी लैच बोलायला लागले. लोकांना माहीत आहे असल्याचे पाटील यांनी म्हटले. 


भाजपचे एक-एक ऑफिस कोट्यवधीचे असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. गुप्त मतदान पैशांनी विकत घेता येता हे भाजपने दाखवून दिले असल्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. घोडेबाजाराच्या आरोपावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली होती. 


पाहा व्हिडिओ: 'हे जिंकले तर यांचं तत्वज्ञान, आम्ही जिंकलो तर घोडेबाजार'


 



विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.  भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. अकोल्यातही भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. 


>> विधान परिषदेचा निकाल काय


 


> नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5 


 


> अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31