Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : नागपूर पाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला अकोला अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात धक्का दिला आहे. भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला.  तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल  'जायंट किलर' ठरले आहेत. 


अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय 31 मते अवैध ठरली. 


अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेली भाजपने ही निवडणूक सर्व ताकदनिशी लढवली होती. अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 


 







 


शिवसेनेला धक्का


हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात होता. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहुमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. 1998 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2004 पासून शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजोरिया सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.



विधान परिषदेचा निकाल काय


> नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5 


>अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha