Maharashtra Unseasonal Rain : राज्यातील काही जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरुच आहे. तर काल झालेल्या पावसामुळे पुरती दाणादाण उडवली असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे घरांसह पिकांचं मोठं नुकसान झालं. हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला होता. तर तळकोकणात दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता


यवतमाळ


हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून हा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. शेतातील कांदा, गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास आर्णी तालुक्यातील महागाव कसबा, बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती, कोपरा, जूनुना या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. या पावसाने हरभरा, गहू, मिरची, कांदा, आंबा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. काढणीला आलेला शेतातील उभा गहू जमिनीवर अक्षरशः झोपला. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सोबतच गव्हाची प्रत सुद्धा खालावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे भाव सुद्धा मिळणार नाही. यात शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. जवळपास दीड तास झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले. अवकाळी प्पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. 


अहमदनगर


अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पारनेर, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, नगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, कलिंगड, मका  पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यात खडकवाडी येथे झालेल्या गारांच्या पावसामुळे कलिंगड पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीची आकडेवारी समोर येईल.


हिंगोली


हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी, औंढा या भागामध्ये अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र अचानक झालेल्या पावसाने उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे भाजीपाला, फळबागांसह हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.


कोकण


तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ गळून मातीमोल झाली आहेत. तर अवकाळी पाऊस पडल्याने जाभुळात जंतू तयार होणार त्यामुळे ते फेकून द्यावं लागणार आहे. आंब्यातही पावसामुळे जंतू तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतातूर झाले आहेत.


बुलढाणा


बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली तर बुलढाणा तालुक्यात काल दुपारी गारपीट सुद्धा झाली. यात खामगाव, नांदुरा, चिखली, बुलढाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. बुलढाण्यासह परिसरात गारपीट झाल्याने फळ पिकांचे आणि कांदा पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. 


सांगली


सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसाने तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुनील धाबुगडे या शेतकऱ्याने बेदाण्यासाठी रॅकवर टाकलेली द्राक्षे कालच्या पावसात भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर नंदकुमार या शेतकऱ्याच्या बागेतील द्राक्ष विक्री न झाल्याने कालच्या पावसात द्राक्षचे देखील नुकसान झाले आहे. एकीकडे द्राक्षाला दर नाही आणि दुसरीकडे बेदाणा करणाऱ्यास टाकलेल्या शेतकऱ्यांवर या अस्मानी संकटामुळे आणखीन संकट वाढले आहे. दुसरीकडे महावितरण कडून वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांने लाईट बिल कसे भरावे असा प्रश्न उपस्थित करत आता सरकारने तातडीने पंचनामे करुन ठोस मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.