मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने घटस्थापनेपासून धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील अनेक ठिकाणच्या मंदिर प्रशासनांनी तयारी सुरु केली आहे. नवरात्री उत्सवात तर मंदिरांमध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत गरबा आणि दांडिया खेळण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर मुंबईबाहेर नियमांचे पालन करुन हे खेळ खेळावेत असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.


नाशिक.. 
नाशिकच्या कालिका माता देवस्थान ट्रस्टकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकरण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर साडेतीन शक्तीपीठापैकी असलेल्या सप्तश्रृंगी गडावर देखील नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, याला भाविकांकडून विरोध होत आहे.


सप्तश्रृंगी देवीचे मंदिर 24 तास सुरू राहणार आहे. मात्र, ऑनलाइन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस आवश्यक आहे. लस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.


नियमावली..



  • नवरात्र काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरवण्यावर बंदी.

  • गडावर खासगी वाहनांना नवरात्र काळात असेल बंदी

  • नांदुरीवरून गडावर जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.


तुळजापूर
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दर्शनासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचेही दर्शन भक्तांना घेता येईल. मात्र, त्यासाठी मंदिर संस्थान आणि प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 


Maharashtra Unlock | महाराष्ट्र अनलॉक! 4 ऑक्टोबर शाळेची घंटा, 7 ऑक्टोबर मंदिराची घंटा अन् 22 ऑक्टोबर थिएटरची घंटा वाजणार..


अशी आहे नियमावली 



  • दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश. 

  • परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश.

  • लसीकरण न झालेल्या भाविकांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक.

  • गर्दी न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक.

  • चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक.

  • नवरात्रौत्सवात कोजागिरी पौर्णिमा रद्द, 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात बंदी, तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नाही.

  • तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षांवरील नागरिकांना तसेच गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही.

  • भाविकांना केवळ मंदिरात प्रवेश, अभिषेक आणि इतर विधींना परवानगी नाही.



श्री संत गजानन महाराज मंदिर 
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येत्या 07 तारखेपासून म्हणजे गुरुवारी सकाळपासून उघडणार असल्याची माहिती शेगाव संस्थानाकडून मिळाली आहे. गेल्यावेळी प्रमाणे कोरोनाचे नियम पाळून फक्त ऑनलाइन ई पास धारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून दररोज फक्त 9 हजार पासधारक भक्तांना दर्शन घेता येणार आहे. तसेच 10 वर्षाच्या आतील व 65 वर्षावरील भक्तांना प्रवेश नसणार आहे. मंदिराकडून ई पास काढण्यात काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर देण्यात आला असून हा नंबर 24 तास आपल्या मदतीस असेल.