मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आता राज्य सरकारकडून (Maharashtra Govt) अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केली जात आहे. राज्य सरकारकडून शाळा, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहांसोब नाट्यगृहंही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 4 ऑक्टोबरला शाळांची घंटा वाजणार आहे तर नवरात्रीच्या (Navratri) पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. आणि 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहातही तिसरी घंटा ऐकायला मिळणार आहे. यासोबत आता कॉलेजही सुरु करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


राज्यातील विद्यामंदिरंही उघडणार..
राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु (Schools Reopening) करण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.


आधी कोरोनामुक्त झालेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतर आता ग्रामीण भागात पाचवी ते 12 आणि शहरी भागात आठवी ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले आहे. शाळा सुरु करण्याअगोदर आजारी मुलांना कसं शोधायचं? त्याच्या संदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यायची या संदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


धार्मिक स्थळेही उघडणार
घटनस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मंदिरावर उपजीविका करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना आनंदाचे भरते आले आङे. देव नाही तर सरकार पावले अशी म्हणण्याची वेळ यांच्यावर आलीय कारण विस्कटलेली आर्थिक घडी सुधारेल असा विश्वास त्यांना वाटतोय. 


तिसरी घंटा वाजणार..
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.


राज्यातील कॉलेज लवकरच सुरू होणार : सामंत 
राज्यातील कॉलेज लवकरच सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार राहावं. सर्व कुलगुरूंना याबाबत सुचना देण्यात आल्या असून येत्या आठ दिवसात त्याबाबत अहवाल तयार होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे दिली आहे. दरम्यान, अहवाल आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना दाखवला जाईल आणि कॉलेजबाबतचा निर्णय होईल. त्यामुळे कॉलेज आता सुरू होणार या मानसिकतेमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी राहावं असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI