सांगली : सांगलीतील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सचिन सर्जेराव पवार असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून सचिन याचे सांगली-कोल्हापूर रोडवर शुभम गार्डन या नावाने हॉटेल आहे. कोरोनाने झालेले लॉकडाऊन, त्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्याने सचिन यांच्या डोक्यावर बरंच कर्ज झालं होतं. या कर्जबाजारीपणाला कंटाळूनच सचिन पवार यांनी जयसिंगपूर-अंकली रेल्वे मार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलीय.

Continues below advertisement


सचिन यांनी 2018 साली हॉटेल व्यवसायासाठी मोठं कर्ज घेतलं. पण कर्ज घेतलेल्या सालापासून जी संकटे येत गेली त्यात सचिन कर्ज फेडू शकले नाहीत. 2019 चा महापूर, नंतर कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन आणि पुन्हा आलेला महापूर यामुळे सचिन पवार यांच्या व्यवसायाचे पूर्ण गणितच बिघडुन गेले. व्यवसायचं ठप्प असल्याने कामगारांचा पगार कसा भागवायचा? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेतून त्यांची मानसिकता बिघडली होती. त्यातूनच त्यांनी जयसिंगपूर-अंकली रेल्वे मार्गावर रेल्वेली उडी घेऊन आत्महत्या केली.


महापूर आणि लॉकडाऊननंतर हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याची गरज होती. ना शासनाकडून या हॉटेल व्यावसायिकांच्या करात सवलत मिळाली, ना वीज बिलात. घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडणे देखील हॉटेल चालकांना शक्य झाले नाही. या आर्थिक विवंचनेतूनच सचिन पवार यांनी आत्महत्या केली. सरकारने या व्यावसायिकांकडे जर वेळीच लक्ष दिले असते तर अशा पद्धतीने सचिन पवार यांच्या सारख्या हॉटेल व्यावसायिकावर अशा पद्धतीने टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली नसती असे हॉटेल व्यावसायिक म्हणतायत.


आज सातत्याने येत असल्याने सर्वच घटकांची आर्थिक घडी विस्कटलीय. अशा परिस्थितीत प्रत्येक घटकाला धीराने लढण्याबरोबरच मदतीची देखील गरज असते जी मिळणे गरजेचे आहे. अन्यथा अशा आत्महत्या वाढण्याची भीती जास्त आहे.