मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पर्यटनासाठी उज़्बेकिस्तानच्या ताशकंद येथे गेलेले महाराष्ट्रातील जवळपास 39 नागरिक विमानसेवा नसल्याने अडकून पडले आहेत. मायदेशी परतण्याची शक्यता दिसत नसल्याने बिथरून या पर्यटकांनी थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना उज़्बेकिस्तान येथून व्हिडीओ कॉल केला. 'तुम्ही घाबरू नका, मी पवार साहेबांच्या कानावर घालतो' जयंत पाटील यांचे हे शब्द ऐकून त्या पर्यटकांना मोठा धीर आला. दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. यात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात आहे.


सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. जगभरातील नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. अशातच महाराष्ट्रातील जवळपास 39 नागरिक विमानसेवा नसल्याने उज़्बेकिस्तानच्या ताशकंद येथे अडकले आहेत. 10 मार्चला हे पर्यटक भारतातून गेले होते तर काल (16 मार्च) हे पर्यटक मायदेशी परतणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांना विमानसेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. घाबरलेल्या या पर्यटकांनी मंत्री जयंत पाटील यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. तुम्हाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वच प्रयत्न केले जातील. तसेच शरद पवार यांना तुम्हाला परत आणण्यासाठी केंद्राकडे शब्द टाकण्यासाठी विनंती करेल, असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी त्या पर्यटकांना दिले आहे.

Coronavirus | कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्णांसोबत दुजाभाव करु नका : राजेश टोपे

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 42 झाला आहे. पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. यापैकी पुणे शहरात आठ आणि पिंपरी चिंचवडमध्ये 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, मुंबईमध्ये दुबईमधून परतलेल्या एका 64 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | सौदीहून परतलेल्या सुरेश प्रभू यांचा सेल्फ क्वॉरन्टाईनचा निर्णय
राज्यातील लोकांची प्रकृती स्थिर
सध्या ज्या कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. अशा सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना विषाणूपासून होणारा आजार हा पूर्णपणे बरा होणारा आहे. त्यामुळे घाबरून जावू नका, फक्त काळजी घ्या असेही टोपे म्हणाले. सोबतच कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्णांसोबत दुजाभाव न करण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं. राज्यातील 800 चाचण्यांपैकी 42 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच लक्षणं आणि ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्या लोकांचीच तपासणी केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.

coronavirus | कॉर्पोरेट हब असणाऱ्या बीकेसीवर 'कोरोना' इफेक्ट, खासगी कंपन्यांचं 'वर्क फ्राॅम होम'