नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनीही काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारमधील माजी रेल्वे मंत्री आणि भाजपचे खासदार सुरेश प्रभू यांनी सेल्फ क्वॉरन्टाईन अर्थात स्वत:ला विलग केलं आहे. याआधी केंद्रीय संसदीय कार्यराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही स्वत:ला घरातच क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.

भाजप खासदार, सुरेश प्रभू 10 मार्च रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. सौदी अरेबियात 10 मार्च रोजी शेरपाज बैठकीत सहभागी झाले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. अहवाल निगेटिव्ह आला. मात्र खबरदारी म्हणून सुरेश प्रभू यांनी स्वत:ला 14 दिवसांसाठी विलग करण्याचा निर्णय घेतला. ते स्वत:च्या घरी क्वॉरन्टाईन आहेत. या काळात ते कोणालाही भेटणार नाही किंवा कोणी त्यांच्याजवळ जाणार नाही. एक वैद्यकीय पथक त्यांच्या घरात तैनात करण्यात आलं आहे.




व्ही. मुरलीधरनही सेल्फ क्वारन्टाईन
याआधी मोदी सरकारमधील संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरातच स्वत:ला क्वॉरन्टाईन केलं आहे. त्यांच्या स्टाफने मंगळवार (17 मार्च) याची माहिती दिली. स्टाफच्या माहितीनुसार, "व्ही. मुरलीधरन केरळमध्ये एका परिषदेसाठी गेले होते, तिथे ते कोव्हिड-19 बाधिक एका डॉक्टरच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी दिल्लीतील घरातच स्वत:ला क्वारन्टाईन केलं आहे." मुरलीधरन यांची तसापणीही केली होती, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मुरलीधरन यांनी संसदेत गेलेले नाहीत. सोबतच भाजपच्या संसदीय बैठकीतही सहभागी झाले नव्हते.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 147
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 147 वर पोहोचली आहे. तर 5700 पेक्षा जास्त जण देखरेखीखाली आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी (17 मार्च) 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील मृतांची संख्या तीन झाली आहे.

महाराष्ट्रात 42 जण कोरोनाबाधित
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 42 झाला आहे. पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 17 मार्चला या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. नेदरलॅंड आणि फ्रान्सहूनही व्यक्ती जाऊन आली होती.

Coronavirus | सौदीहून परतलेल्या सुरेश प्रभू यांचा सेल्फ क्वॉरन्टाईनचा निर्णय | ABP Majha