मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (mumbai pune highway) वर केबल -स्टेड ब्रीज (Cable Stayed Bridge) बांधण्यात येणार आहे. हा ब्रीज भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड रोड ब्रीज असेल. हा केबल-स्टेड रोड ब्रीज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रमुख अफकॉन्स (Afcons) या कंपनीकडून  बांधण्यात येत आहे. या 132 मीटर उंच पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. 


मुंबई-पुणे प्रवास  आणखी जलद होणार
मुंबई-पुणे दैनंदिन प्रवास करणारे हजारो लोक आहेत. तसेच काहीजण कामानिमित्त, वैयक्तिक कामासाठी कायम मुंबई-पुणे प्रवास करतात. परंतु, या मार्गावर खंडाळा घाटात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ येथे वाया जातो. मात्र, या केबल स्टेड रोड ब्रीजमुळे या दोन शहरांमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा 25 मिनिटे वेळ वाचणार आहे. कारण मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी 19 किलोमीटर आहे. या ब्रीजचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे अंतर सहा किलोमिटरने कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई - पुणे मार्गावरील प्रवास जवळपास 25 मिनिटांनी कमी होणार आहे. 




महामार्गाचे रूंदीकरण होणार


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागण्यात आलाय. यातील पॅकेज दोनचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये सध्याच्या द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण होईल. शिवाय दोन उड्डाणपूल होतील. त्यापैकी एका ब्रीजमध्ये केबल-स्टेड ब्रिजसह  इतर कामांचा समावेश आहे. यातील सुमारे 850 मीटर लांबीच्या व्हायाडक्ट-I साठी फाउंडेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर प्री-टेन्शन गर्डर्स आणि डेक पॅनेलचे लॉन्चिंग प्रगतीपथावर आहे. केबल-स्टेड पुलाची लांबी जवळपास  650 मीटर लांब आहे.  तर हा पूल जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असेल, जो देशातील इतर रस्ते प्रकल्पामधील सर्वात उंच पूल असेल.




अफकॉन्स कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक रणजीत झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या व्हायाडक्ट टूमध्ये  फाउंडेशन, पिलर आणि पायलॉन (केबल स्टेड ब्रीज पिलर)  बांधण्याचे काम सुरू आहे. या व्हायाडक्टमधील सर्वात उंच पायलॉन जमिनीच्या पातळीपासून 182 मीटर  असेल. 


'मुंबई-पुणे  एक्स्प्रेस वे वरील अपघाताचे प्रमाण कमी होणार'


मुंबई-पुणे  एक्स्प्रेस वे हा सध्या अपघाताचा सापळा बनलाय. या मार्गवर सतत मोठ-मोठे अपघात होत असतात. या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परंतु, या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती रणजीत झा यांनी दिलीय. "खंडाळा घाट हा भूस्खलन आणि अपघातप्रवण भाग आहे. नवीन लिंकमुळे अपघात कमी होण्यासोबतच इंधन कार्यक्षमता सुधारण्यास आणि वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पॅकेज टूचे काम 2019 मध्ये सुरू झाले असून हे काम 2024 मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती झा यांनी दिली आहे. 


रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग आव्हानात्मक


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भारतातील सर्वात उंच केबल -स्टेड ब्रीज उभारला जाणार आहे. परंतु, हा ब्रीज पूर्ण होण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अत्यंत अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वेचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते. या ब्लास्टिंग दरम्यान केवळ वाहतूकच नाही तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील काम देखील थांबवले जाते. शिवाय मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते. द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतुकीदरम्यान सामग्रीची वाहतूक आणि गर्डरचे स्थलांतर हीसुद्धा टीमसमोरील इतर काही आव्हाने आहेत. 


पॅकेज अंतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गाचे  5.86 किमी  रुंदीकरण होईल. 10.2 किमी रस्त्यांचे बांधकाम होईल. याबरोबरच 132 मीटर उंच केबल-स्टेड ब्रीजच्या बांधकामासह केबल-स्टेड ब्रिजमध्ये 182M चा उंचीचा सर्वात उंच पायलॉन असेल.