PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (22 ऑक्टोबर) देशातील 75 हजार तरुणांना दिवाळीचं गिफ्ट (Diwali gift) देणार आहेत. व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान आज देशातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी 75 हजार तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचे पत्र (Job Appointment Letter) देण्यात येणार आहे. त्यामुळं या तरुणांसाठी ही दिवाळी खास असणार आहे. विविध भरतीच्या विहित निवड प्रक्रियेतून निवडलेल्या या युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.


आजच्या या पंतप्रधानांच्या ऑनलाईन कार्यक्रमात देशाच्या विविध भागांमधून केंद्रीय मंत्री सहभागी होतील. सत्तारुढ खासदारही आपापल्या मतदारसंघांमधून यामध्ये सहभागी होतील. केंद्राच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याची कबुली सरकारनं संसदीय अधिवेशनात दिली होती. ती रिक्त पदे आता भरण्यात येत आहेत. बेरोजगारीवरुन विरोधी पक्षांतर्फे मोदी सरकारवर वारंवार टीका केली जाते. स्वातंत्र्यानंतर बेरोजगारीचा दर देशात सध्या सर्वाधिक आणि विक्रमी आहे अशीही टीका केली जाते. जूनमध्ये केंद्र सरकारनं सांगितले होते की, पुढच्या दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र सरकार 10 लाख तरुणांना नोकऱ्या देईल. सर्व मंत्रालये आणि विभागातील रिक्त जागांचा आढावा घेऊन मिशन मोडमध्ये या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे.


केंद्र सरकारनं केली होती 10 लाख नोकऱ्यांची घोषणा


केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आज देशातील 75 हजार बेरोजगारांना नोकरींचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरिक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, आयकर निरिक्षक या विविध पदांसाठी यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून ही भरती केली जात आहे. पंतप्रधान मोदी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र दिलेल्यांशी बातचित करणार आहेत. 


मुंबईतील कार्यक्रमात पियुष गोयल तर पुण्यातील कार्यक्रमात नारायण राणे राहणार उपस्थित


मुंबईत पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा, बावनकुळे, शेलार रोजगार मेळा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. पुण्यात यशदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. नागपुरातही रेल्वेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात 200 तरुणांना रेल्वे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागात संदर्भात नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते नागपुरात नियुक्तीपत्र मिळणाऱ्या काही तरुणांशी पंतप्रधान संवाद साधू शकतात. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.